प्रकल्प अधिकार्यांच्याकडून धारणीत कोरोना उपाययोजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:05+5:302021-04-30T04:16:05+5:30
धारणी : प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी धारणी तालुक्यातील विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरला भेटी देऊन कोरोना उपचार ...
धारणी : प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी धारणी तालुक्यातील विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरला भेटी देऊन कोरोना उपचार व विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. त्रिसूत्री पालनाबरोबरच स्टीम सप्ताहाची गावोगावी प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी जयश्री नवलाखे, मनोहर अभ्यंकर, विस्तार अधिकारी बाबुलाल शिरसाठ आदी उपस्थित होते. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटर येथील सोयीसुविधांची पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याचे, तसेच कोरोना लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली व गावामधील कंटेनमेंट झोनचीही पाहणी केली. चिखली आश्रमशाळेतील कोविड सेंटर येथे औषधी साठा, अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. रणमले यांनी यावेळी सांगितले.
होम आयसोलेटेड रुग्णांवर भर
गृह विलगीकरणातील रुग्णांकडून नियम पाळले जावेत. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच्या वेळेत कुठेही गर्दी होऊ नये. त्रिसूत्रीचे पालन व स्टीम सप्ताहाबाबत वेळोवेळी जनजागृती करावी, असेही निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले.