पीककर्ज वाटपसंदर्भात आढावा
By admin | Published: May 29, 2017 12:10 AM2017-05-29T00:10:40+5:302017-05-29T00:10:40+5:30
येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
अधिकाऱ्यांना सूचना : लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या खरीप हंगामात पीक कर्ज, बी- बियाणे वाटपसंदर्भात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पीक कर्जापासून कोणीही शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात.
बैठकीला खा. आनंदराव अडसूळ यांच्यासह आ. वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, माजी आ. संजय बंड, अचलपूरचे नगराध्यक्ष सुनीता फिस्के, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील खराटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, नरेंद्र पडोळे, नाना नागमोते, नगरसेवक नरेंद्र फिस्के, किशोर कासार, बंडु घोम, शोभा लोखंडे, सुनील भालेराव यांच्यासह कृषी, बॅकांचे अधिकार उपस्थित होते. प्रारंभी खासदार अडसूळ यांनी पीक कर्ज, बियाणे संदर्भात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली.
जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आणि बँकांचे धोरण यातील माहिती जाणून घेताना एकही शेतकरी यंदा पीक कर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात. पीक कर्जासाठी शेतकरी बँकेत आल्यास त्यांच्याशी सौजन्याने वागणूक द्या. बँकेत स्वतंत्र पीक कर्ज सहाय्य कक्ष उघडून मार्गदर्शन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेत. ३ टक्के व्याज दराने कर्ज पुरवठ्यातून पात्र शेतकरी वगळू नये, ही बाबदेखील त्यांनी लक्षात आणून दिली. पीक कर्ज वाटप करतावेळी शिबिरातून शेतकरी वंचित राहू नये. पीक कर्जाबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी बँकानी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जात वळती करु नये, असे काही उदाहरण समोर आल्यास बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाईल, असेही खा. अडसूळ म्हणाले. जिल्ह्यात बि- बियाणे, रासायनिक खतांची मागणी व पुरवठा याचा आढावा घेताना कृषि अधिकाऱ्यांनी यावेळी बियाणे, खतांचा पुरवठा कमी होणार नाही, ही ग्वाही त्यांनी दिली. तसेच पीक कर्ज नाहकरत प्रमाणपत्रातही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही. कपाशी, तूर, सोयाबीन आदी बियाणांचा काळाबाजार होणार नाही. त्याकरिता स्वतंत्र पथक गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिलेत. शेतकरी लक्ष ठेवूनच प्रशासनाने भूमिका बजवावी, अशा सूचना खासदार अडसूळ यांनी दिल्यात. दरम्यान कृषि अधिकाऱ्यांनी रासायनिक खताची आवक करताना रेल्वे रॅकचा प्रश्न उपस्थित केला. नरखेड रेल्वे मार्गावर चांदूरबाजार येथे नवीन रेल्वे रॅक निर्माण झाल्यास ग्रामीण भागात खत पुरवठा करतान येणारी अडचण दूर होईल, असे कृषि अधिकारी म्हणाले.