पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज वितरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:49+5:302021-06-05T04:10:49+5:30

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. ...

Review of crop loan disbursement by Guardian Minister | पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज वितरणाचा आढावा

पालकमंत्र्यांकडून पीक कर्ज वितरणाचा आढावा

googlenewsNext

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्ज वितरण गतीने होणे आवश्यक आहे. कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगून कामे करावीत व कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

खरीप कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आ. सुलभाताई खोडके, आ. बळवंतराव वानखडे, आ. प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँक व्यवस्थापक एल. के. झा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, गतवर्षापासून कोरोना साथीची कठीण वेळ आहे. शेती क्षेत्र अडचणीत आहे. या काळात खरीप हंगामात बियाणे निविष्ठा व इतर कामांसाठी शेतकरी बांधवांना पीक कर्ज वेळेत मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संवेदनशीलता बाळगून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती द्यावी. त्यांना अर्ज मिळण्यासाठी सहकार्य करावे. एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांना कर्ज मिळण्यासाठी चकरा माराव्या लागतात, अशाही तक्रारी आहेत. तसे घडू नये. कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच प्रशासनाने दिली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. शेतकरी बांधवांची अनावश्यकरीत्या अडवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विविध योजनांचा निधी बँकाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो. त्याचे वितरण वेळेत झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसे बँकेत येतात; पण ते शेतकरी बांधवांना वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. असे यापुढे कधीही घडता कामा नये, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा खरिपासाठी दीड हजार कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ते पूर्ण व्हावे यादृष्टीने वेगाने कर्जवितरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

--

Web Title: Review of crop loan disbursement by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.