पालकमंत्र्यांकडून मेळघाटात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:38+5:302021-04-16T04:13:38+5:30
चिखलदरा : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या सुविधेकरीता रवी हंगाम २०२०-२१ वर्षांसाठी आधारभूत किमतीवर शासकीय खरेदी केंद्रे ...
चिखलदरा : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या सुविधेकरीता रवी हंगाम २०२०-२१ वर्षांसाठी आधारभूत किमतीवर शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रावर मका व गहू धान्याची खरेदी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. गुरुवारी त्यांनी विविध योजनांची माहिती घेऊन पाहणी केली.
आदिवासी विकास महामंडळाद्वारे आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, यामध्ये धारणी तालुक्यातील बैरागड, हरिसाल, सावलीखेडा, चाकरदा, साद्राबाडी, चिखलदरा तालुक्यातील चुरणी, गौलखेडा बाजार येथे ही केंद्रे सुरू
करण्यात आली आहेत. या केंद्रांवर गव्हासाठी १९७५, तर मक्यासाठी १८५० रुपये आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
-----------------
विविध ठिकाणी भेटी
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील मोथा, आमझरीसह इतर ठिकाणी भेटी दिल्या. त्यात त्यांनी आरोग्य यंत्रणा, मग्रारोहयो अंतर्गत होणारी कामे, पुरवठा विभाग आदींचा आढावा घेतला.