वरूड येथे अटल भूजल योजनेची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:54+5:302021-08-21T04:16:54+5:30
वरूड : वरूड-मोर्शी तालुक्यातील भूजल पातळीत सातत्याने घट होत असून, ही चिंतेची बाब आहे. भूजलपातळीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आमदार ...
वरूड : वरूड-मोर्शी तालुक्यातील भूजल पातळीत सातत्याने घट होत असून, ही चिंतेची बाब आहे. भूजलपातळीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आमदार देवेंद्र भुयार यांनी वरूड येथे अटल भूजल योजनेचा आढावा घेतला. यात वरूड तालुक्यातील ८६ गावांचा व मोर्शी तालुक्यातील ७७ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत्यासाठी व या योजनेवर विचार विनिमय करण्यासाठी "अटल भूजल योजना" अंतर्गत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत नगर परिषद सभागृह वरूड येथे बैठक पार पडली.
बैठकीत प्रस्तावित जलसंधारण उपाययोजना, प्रगतिपथावरील कामे, भूजल योजनेकरिता लागणाऱ्या निधीची तरतूद, भूजल सर्वेक्षण आणि त्यासाठी योजनेंतर्गत विकास यंत्रणा, अटल भूजल योजनाकरिता मतदारसंघातील गावांची संख्या, जलसंधारण सर्वेक्षण, पाणीपुरवठा यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वरूड-मोर्शी तालुक्यात सर्व विभागांच्या माध्यमातून माहिती संकलित करणे व प्रत्येक गावात प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जल अर्थसंकल्प व जलसुरक्षा आराखडे त्वरित करणे, गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांनी एकत्रित येऊन जलसुरक्षा आराखडे करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. वरूड- मोर्शी तालुक्यातील शोषित, अति शोषित व अंशतः शोषित गावांची भूजल पातळी वाढण्यासाठी व गुणवत्ता सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आ. देवेंद्र भुयार यांनी दिले. यावेळी संबंधित गावांचे सरपंच, सचिव, ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था अमरावती, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी वरूड, उपअभियंता जलसंपदा विभाग वरूड, उपअभियंता जलसंधारण विभाग वरूड, उपअभियंता लघु सिंचन वरूड - मोर्शी, वनपरिक्षेत्र अधिकारी वरूड, तालुका कृषि अधिकारी वरूड, तालुका कृषी अधिकारी मोर्शी उपस्थित होते.