राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेने दिला क्रांतिकारक स्त्रीविचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:16 PM2017-10-09T22:16:28+5:302017-10-09T22:16:51+5:30
पराक्रम केवळ पुरुषच करू शकतात असा समज आहे. परंतु, मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : पराक्रम केवळ पुरुषच करू शकतात असा समज आहे. परंतु, मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करू शकते. मातृत्व हा स्त्रीत्वाचा उच्चांक बिंदू आहे तर ममता हा स्त्रीचा स्वयंभू गुण. मात्र स्त्रीचे हे माऊलीपण, प्रेमळपण पुरेसे नसून तिला उच्चशिक्षणाने विद्याविभूषित केले तरच तिच्यातील स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा पूर्ण विकास होईल आणि पर्यायाने समाजाचीही उन्नती होईल असा क्रांति कारी, वास्तवादी व आदर्श विचार राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून मांडला असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्ष पुष्पा बोंडे यांनी केले.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवातील महिला संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी समाजकल्याण उपायुक्त प्राजक्ता इंगळे, सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा लोळे, पुष्पा नागपुरे, नीता मुंधडा, जि.प.सदस्य गौरी देशमुख, पं.स.सदस्य रंजना पोजगे, मोझरीच्या सरपंच्या विद्या बोडखे, अंजली टापरे, कल्पना देशमुख, शुभांगी बोराडकर, वैद्यकीय अधिकारी ज्योत्सना पोटपिटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासन स्तरावर महिलांसाठी अनेक योजना आहे. परंतु, महिलांच्या समस्या सुटल्या नाही. आईनेच मुला-मुलीत भेदभाव करू नये असे मत समाजकल्याण सहा आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी व्यक्त केले. संमेलनापूर्वी स्त्री भृणहत्या या विषयावर आशा वर्कर यांनी नाटिका सादर केली. संचालन हर्षा गोरटे व अर्चना भुसारी यांनी तर आभार लता ठोसर यांनी मानले.
राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथील ८ आॅक्टोबरच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सामुदायिक ध्यानाने झाली. यावेळी सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर निर्मला पारधे यांनी विचार व्यक्त केले. रात्रीच्या सत्रात अरुण सपकाळ यांच्या संयोजनाखाली आदिवासींचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शकडो गुरुदेव भक्त उपस्थित होते.
ना. सुधीर मुंनगंटीवर यांचे मार्गदर्शन
पुण्यतिथी महोत्सवात १० आॅक्टोबरला ना. सुधीर मुनगंटीवार हे ‘अपना गाव ही तीर्थ बनाओ’ याविषयावर सायंकाळी ६ वाजता विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सुरेश हावरे उपस्थित राहतील. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० वा सामुदायिक ध्यानाने होईल. यावेळी रामप्रियाजी यांचे चिंतन, ७ वाजता शरीरस्वास्थ विषयी तुळशीदास कपाळे यांचे मार्गदर्शन, नंदा पांगुळ-बारहाते ग्रामगीता प्रवचनाचे सहावे पुष्प गुफतील. ९ वाजता अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ कार्यकर्त्याचे संमेलन, दुपारी २.३० वा. सद्गुरू आडकोजी महाराज व जन्मभूमी यावली व तपोभूमी गोंदोडा येथील पालख्यांचे आगमन, ६.४५ वा. श्रीगुरुदेव लटारेबाबा भजन मंडळाचा खंजेरी भजनाचा कार्यक्रम, ७.१५ वा. राष्ट्रसंतांची लोकगीते, ८.१५ वा. बाळासाहेब वाईकर व जगन्नाथ वाडेकर यांचे अभंग गायन, रात्री. ९ वाजता लक्ष्मणदास काळे यांचे कीर्तन.