स्टंटबाजांकडून रिव्हॉल्व्हर जप्त
By admin | Published: January 20, 2016 12:25 AM2016-01-20T00:25:15+5:302016-01-20T00:25:15+5:30
स्टंटबाजीसोबतच चोरी करणाऱ्या अल्पवयीनांकडून राजापेठ पोलिसांनी एक छऱ्याची रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.
राजापेठ पोलिसांची कारवाई : आणखी गुन्ह्यांची कबुली शक्य
अमरावती : स्टंटबाजीसोबतच चोरी करणाऱ्या अल्पवयीनांकडून राजापेठ पोलिसांनी एक छऱ्याची रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. सोमवारी पोलिसांनी शुभम बद्रे (१९) या आरोपीला अटक करून त्याच्यासोबते तीन अल्पवयीन सहकारी ताब्यात घेतले होते.
मागील काही महिन्यांपासून शहरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना तसेच दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यातच स्टंटबाजी करणाऱ्यांची धूम सुध्दा शहरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्रिय होऊन आरोपीचा कसून शोध आहे. दरम्यान राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टंटबाजी करताना काही अल्पवयीन पोलिसांना आढळून आले.
यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले तर अन्य अल्पवयीन पसार झाले होते. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता एकाकडे रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीनाच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये त्याच्याजवळ छऱ्याची रिव्हॉल्व्हर असल्याचे आढळून आले. ती रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी सायंकाळी या सात अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून विविध ठिकाणी ठेवलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.
अल्पवयीन टोळी बनविण्याच्या बेतात
अमरावती : ही अल्पवयीनांची टोळी शहरातील एका नामांकित शाळेतील असून चोऱ्या करून मौजमस्ती करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
यापैकी एका अल्पवयीनाने शासकीय अधिकाऱ्याच्या घरी चोरी करून ५ लाखांची रोख लंपास केली होती. त्यातून त्यांनी दोन महागडया दुचाकी व एक कार सुध्दा खरेदी केली. चौकशीनंतर पोलिसांनी दुचाकी व कार जप्त सुध्दा केली आहे. यातील आरोपी शुभम बद्रे याची पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. अन्य अल्पवयीन विद्यार्थ्यांना नोटीस बजावून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेले अल्पवयीन मौजमस्ती करण्यासाठी चोऱ्या करित होते. चोरीच्या पैशातून महागडी वाहने खरेदी करून स्टंटबाजी करीत होते. त्यांचे चोरीचे डाव साधले जात असल्याने त्यांचे धाडस वाढत गेले आणि त्यांनी पार्ट्या करणे, त्यामध्ये मद्यप्राशन करणे तसेच मौजमस्ती करणे असे विविध प्रकार सुरु केले. हे सर्व असतांना आता रिव्हॉल्वर सुध्दा गरजेची आहे, अशा मानसिकतेतून त्यांनी एका इसमाकडून गावठी रिव्हॉल्वर सुध्दा खरेदी केली. रिव्हॉल्वरच्या धाकावर चोरी करण्याच्या बेतात असलेले ते अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडून रिव्हॉल्वर जप्त केली. तसेच ही मुले टोळी बनविण्याच्या मानसिकतेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
इर्विन चौकात होता अड्डा
चोरीच्या पैशातून महागडी वाहने घेऊन सर्व अल्पवयीन मुले दोन ते तीन दिवसाआड सकाळी ६ वाजताच्या सुमारास इर्विन चौकात एकत्र यायचे. तेथे योजना आखून शहरातील विविध मार्गाने भ्रमंती करीत होते. एक मुख्य सूत्रधार दुचाकी घेऊन पुढे जायचा. अन्य मागे राहत होते. शहरात भ्रमंती करतांना कुठले गुन्हे करायचे याबाबत अद्यापपर्यंत काही उघड झाले नाही. यासंदर्भात राजापेठ पोलीस चौकशी करीत आहे. या अल्पवयीनांनी आतापर्यंत दोन चोरीची कबुली दिली असून आणखी काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पालकांनो सावधान
गेल्या काही वर्षात अल्पवयीन मुले गुन्हेगारी जगताकडे वळत असल्याचे काही घटनांतून उघड झाले आहे. भौतिक सुविधेच्या आहारी जाऊन पॉकेटमनी मिळविण्यासाठी पालकांकडे चालविलेली धडपड यशस्वी होत नसल्याने हे अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलल्या गेल्याचा निष्कर्ष आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांनी केले आहे. तर दुसरीकडे शहर कोतवाली पोलिसांनी दहावीतील विद्यार्थ्यांकडून चोरीच्या दुचाकी जप्त केल्याने हा प्रश्न चर्चेत आला आहे.