कापूसतळणी येथील तांदूळ तस्कराला अटक, १५४ क्विंटल धान्य जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 03:06 PM2023-03-24T15:06:19+5:302023-03-24T15:09:18+5:30
अंजनगाव सुर्जी पोलिसांची कारवाई
वनोजा बाग (अमरावती) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथून १५४.५० क्विंटल वजनाचा १८५ शासकीय तांदूळ बुधवारी रात्री १२ वाजता छापा टाकून जप्त करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला मात्र रात्रीच अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून उशिरा झालेल्या या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, मिर्झा गुफरान बेग ऊर्फ मुन्ना मुस्तफा बेग (४२, रा. नारायणपूर, कापूसतळणी) असे शासकीय तांदळाची तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २२ मार्च रोजी रात्री २ वाजता अंजनगाव सुर्जीचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या आदेशावरून ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी कापूसतळणीतील जामा मशिदीजवळ असलेल्या आरोपीच्या गोदामाजवळील पिकअप वाहन (एमएच २७ एक्स ८१५९) मधून १५४ क्विंटल ५० किलो शासकीय तांदळाची १८५ पोती व वाहन जप्त करून करण्यात आले. त्यापूर्वी २१ रोजी रात्री ८ वाजता कापूसतळणी बसस्थानकात तांदूळ तस्कर गुफरान ऊर्फ मुन्ना हा रहिमापूर पोलिस ठाण्याच्या वाहनात स्वार होताना दिसला. त्यालाच अंजनगाव पोलिसांनी पहाटे २ वाजता त्याला अटक केली.
नारायणपूरचा काही परिसर अंजनगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आहे. तांदूळ तस्कर मुन्ना याचे गोदाम असलेला परिसर मात्र रहिमापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापूसतळणीत येतो. येथूनच बीट जमादाराच्या डोळ्यात धूळ फेकून खुलेआम तांदळाची तस्करी होते. मुन्नाची माणसे घरोघरी जाऊन शासकीय रेशन दुकानातून मिळालेला तांदूळ खरेदी करून गोळा करतात. भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातही तांदळाची तस्करी केली जाते, अशी माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक नारायण शिवाजी काकडे यांच्या तक्रारीवरून गुफरान उर्फ मुन्ना याला अटक करून शासकीय वाहनासह तांदूळ असा ११ लाख ६३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.