ट्रकमधील तांदूळ शासकीय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:33+5:30

कोरोनाकाळात मिळत असलेले रेशनचे धान्य काही जणांकडून विकले जात आहे. यात धान्य तस्कराची चांदी झाली आहे. या गैरप्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अंजनगाव सुर्जी, परतवाडा व चांदूर बाजार येथे शासकीय धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात आणणारे तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

The rice in the truck is government? | ट्रकमधील तांदूळ शासकीय?

ट्रकमधील तांदूळ शासकीय?

googlenewsNext
ठळक मुद्देचौकशीची मागणी : दुभाजकावर चढल्याने वाहनाला अपघात; तालुक्यात धान्य तस्कर सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास अंजनगाव सुर्जीहून चांदूर बाजारात दाखल झालेला तांदुळाने भरलेला ट्रक जमापूर फाट्याजवळ रस्ता दुभाजकावर चढल्याने अपघातग्रस्त झाला. या ट्रकमध्ये असलेला तांदळाचा साठा तस्करांनी अवघ्या काही तासांतच गायब केला. मात्र, त्याचा सांडलेला सडा पुरावा देत होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकविरुद्ध गुन्हा नोंदवित थातूरमातूर कारवाई केली. त्यामुळे हा तांदूळ शासकीय धान्य कोट्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाकाळात मिळत असलेले रेशनचे धान्य काही जणांकडून विकले जात आहे. यात धान्य तस्कराची चांदी झाली आहे. या गैरप्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अंजनगाव सुर्जी, परतवाडा व चांदूर बाजार येथे शासकीय धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात आणणारे तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात या तस्करांचे चेहेरे उघड पडणार होते. मात्र, पोलिसांनी वाहनात कशाचा माल आहे, याची पाहणीच केली नसल्याची माहिती दिली.
अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसतानाही ट्रकचालक पसार झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी तांदूळ साठ्याचा मालक व ट्रकमालकाविरुद्ध कारवाई केलेली नाही. त्याच वेळी परिसरातील नागरिकांनी तसेच ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ साठा असल्याची माहिती दिली. तो तातडीने रिकामा करण्यात आला तरी काही तांदूळ घटनास्थळीच पडून होते. एकंदर प्रकार पाहता, ट्रकमध्ये शासकीय तांदूळ असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

अपघातानंतर ठाण्याची वारी
ट्रकच्या अपघातानंतर चांदूर बाजार येथील एक धान्य तस्कर व अंजनगाव सुर्जी येथील धान्य तस्कर पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे अनेकांनी बघितले. त्यानंतरही पोलिसांनी केलेल्या थातूरमातूर कारवाईने संशय निर्माण केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच तालुक्यातील रेशन दुकानांतील धान्य खरेदी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

आम्ही केवळ अपघाताची नोंद घेतली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये नेमके काय होते. त्याबाबत चौकशी केलेली नाही. चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करता येईल.
- उदयसिंग साळुंके,
ठाणेदार, चांदूरबाजार.

Web Title: The rice in the truck is government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात