रिद्धपूर विकास आराखडा व्यापक व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:58+5:302021-01-01T04:08:58+5:30
मोर्शी : मतदारसंघातील रिध्दपूर विकास आराखड्यात प्राचीन काळातील महानुभाव पंथीय मंदिरांचा समावेश करून १०० कोटी विकास निधीस मंजुरी देऊन ...
मोर्शी : मतदारसंघातील रिध्दपूर विकास आराखड्यात प्राचीन काळातील महानुभाव पंथीय मंदिरांचा समावेश करून १०० कोटी विकास निधीस मंजुरी देऊन रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकासाची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
महानुभाव पंथाची काशी व मराठी साहित्याची आद्यभूमी असलेल्या रिद्धपूरचे महात्म्य लक्षात घेऊन रिद्धपूर येथील विकास आराखडा तत्काळ मंजूर करून देण्यासाठी तसेच रिद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. रिध्दपूर महानुभाव पंथीयांचे पावन तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभू, दत्तात्रय प्रभू, श्रीकृष्ण महाराज यांनी वास्तव्य केल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. येथील सर्व महानुभाव पंथीय मंदिरे अतिशय जुनी असून जीर्ण झालेली आहेत. मंदिरात ये-जा करण्यास असलेले रस्ते खराब झाल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते, नाली, सभागृह, शौचालय, पिण्याची पाण्याची सोय, संरक्षण भिंत, स्मशानभूमी, दफनभूमी, बाग सौंदर्यीकरण, विश्रामगृह, वॉल कम्पाऊंड बांधकाम करणे, दिवा बत्ती, ग्रंथालय, वाहनतळ, वृक्षारोपण व वृक्षलागवड, सुविधायुक्त बस स्टॅन्ड, हायमास्ट स्ट्रीट लाईट, घणकचरा व खत निर्मिती केंद्र आदी कामे प्राथमिकतेने करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुश्रीफ यांना सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जयराजबाबा पंजाबी, अखिल भारतीय महानुभाव पंथाचे तालुका अध्यक्ष राजेश ठाकरे, पंकज हरणे, सरपंच गोपल जामठे, महेंद्र देशमुख, गाऊस अली, मनोज टेकाडे आदी उपस्थित होते.
-------------