'राइट टू गिव्हअप' पुन्हा 'रिव्हर्ट'साठी ३० पर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:19 PM2024-06-27T13:19:27+5:302024-06-27T13:20:52+5:30
Amravati : शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाडीबीटी पोर्टलवर ' राइट टू गिव्हअप'चा पर्याय निवडल्याने शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळण्याची संधी आहे. संबंधित अर्ज रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार अशा विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.
शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच 'राइट टू गिव्हअप'चा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वेच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम अस्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरूपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्तीसंदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी चुकून या पर्यायाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून शासनास केली होती. याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. यासंदर्भात काही अडचण उद्भवल्यास समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे
आता प्राचार्यांच्या लॅगिनमधून प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज
'रिव्हर्ट बँक' करायचा आहे. याकरीता ३० जून डेडलाइन आहे. अशा विद्यार्थ्यांनी सबंधित प्राचार्याशी संपर्क साधायचा आहे. यानंतर प्राचार्य लॉगिनमधून अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. रिव्हर्ट बैंक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील.