शहरातील मध्यवस्तीत ‘बारूद बॉम्ब’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:29 PM2018-11-06T22:29:42+5:302018-11-06T22:30:26+5:30

शहराच्या मध्यवस्तीत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांमुळे ‘बारूद बॉम्ब’चा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यवस्तीत फटाका व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी कशी, विस्फोटक विभाग व पोलीस का दुर्लक्ष करीत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

The risk of 'ammo bomb' in the city center | शहरातील मध्यवस्तीत ‘बारूद बॉम्ब’चा धोका

शहरातील मध्यवस्तीत ‘बारूद बॉम्ब’चा धोका

Next
ठळक मुद्देपरवानगी कशी? : महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष

वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या मध्यवस्तीत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांमुळे ‘बारूद बॉम्ब’चा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यवस्तीत फटाका व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी कशी, विस्फोटक विभाग व पोलीस का दुर्लक्ष करीत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
फटाका दुकान लावताना विस्फोटक अधिनियमाला अधीन राहून व्यवसाय परवाना दिला जातो. नियमावलीनुसार दुकान लावण्याची जागा निश्चित केली जाते. मात्र, शहराच्या मध्यवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून फटाका व्यावसायिकांची दुकाने आहेत. परवानाधारक असले तरी ती दुकाने नागरिकांसाठी कधीही धोकादायक ठरू शकतात. शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, बडनेरातील चावडी चौकासह अन्य काही मुख्य चौकांमध्ये परवानाधारक फटाका व्यवसाय सुरू आहे. दररोज या परिसरात हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी असते. अशा स्थितीत ही फटाक्यांची दुकाने धोकादायक ठरू शकतात.
पोलीस विभागाकडून दरवर्षी फटाका व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण केले जाते. मुख्य वस्तीतील फटाका व्यावसायिकांकडे अधिकृत परवाना असल्याचे दिसून येते. मात्र, मुख्य वस्तीतील या फटाक्यांच्या दुकानांमध्ये अप्रिय घटना घडल्यास, त्याचे विस्फोटक परिणाम नागरिकांना किती सोसावे लागतील, याची कल्पनाही न केलेली बरी. औरंगाबाद येथील घटनेतून प्रशासनाने बोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
फटाक्यांची नियमबाह्य विक्री
विस्फोटक अधिनियम १८८४ नुसार तयार केलेले विस्फोटक नियम, २००८ मधील विविध प्रतिबंध व नियमांची अंमलबजावणी फटाका विक्री परवानाधारकांना करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फटाक्यांची विक्री होताना दिसून येत आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काय आहे नियमावली?
फटाका विक्रेत्यांची दुकाने निवासी इमारतीत नसावी. इमारतीमधील किंवा तळमजल्यावरील दुकानातून फटाक्यांची विक्री करता येत नाही. फटाकेविक्रीची दुकाने ही खुल्या जागेत किंवा पटांगणामध्येच असावी, अशाप्रकारचे नियम आहेत. अशा नियमांचे पालन करणाऱ्यांना परवाना दिला जातो.

संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फटाका व्यवसाय व्हेरीफाय करतात. एसीपीमार्फत तो अहवाल आमच्याकडे येतो. त्यानुसार आम्ही परवानगी देतो. विस्फोटक अधिनियमाला अधीन राहून ती दुकाने थाटली जाऊ शकतात.
- प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त.

Web Title: The risk of 'ammo bomb' in the city center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.