अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 10:06 PM2022-09-16T22:06:43+5:302022-09-16T22:07:16+5:30
Amravati News पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत.
अमरावती : पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत. येथील घरांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वरूड तालुक्यातील पुसला गावाच्या मध्यभागातून बेल नदी वाहते. नदीकाठी अनेक वर्षांपासून घरे वसली आहेत. सततच्या पावसामुळे नदीला पूर येत आहे. या पुराचे पाणी नदीकाठावरील जमिनीत मुरत असल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे कोलमडून जीवितहानी होण्याच्या शक्यतेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीकाठावरील ग्रामस्थ भीतीपोटी रात्रभर जागतात. गावात अन्यत्र जागा उपलब्ध करून या ग्रामस्थांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गंगा धानोरकर, गजानन धानोरकर, मधुकर धानोरकर, बाळू जाधव, शंकर कोल्हे, मुकिंदा पाटणकर, विठ्ठल कोल्हे, गोविंदराव पाटणकर, हरिभाऊ पाटणकर, सीताराम पाटणकर, गंगाराम कोल्हे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
------------