फिनले मिल, मोझरी-बहिरम महामार्गाचे काम लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:19+5:302021-09-02T04:26:19+5:30
नितीन गडकरींशी बच्चू कडू यांची चर्चा, चिखलदरा स्कायवॉकला वनविभागाची मान्यता मिळवून देणार अमरावती : अचलपूर येथील फिनले मिल ...
नितीन गडकरींशी बच्चू कडू यांची चर्चा, चिखलदरा स्कायवॉकला वनविभागाची मान्यता मिळवून देणार
अमरावती : अचलपूर येथील फिनले मिल सुरू होण्यासह मोझरी- बहिरम या सुमारे १५० कोटी रुपयांच्या महामार्गाचे व चिखलदरा स्कायवॉकचे काम लवकरच मार्गी लागणार असून, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती जलसंपदा, कामगार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. त्यांनी दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले होते.
बैतूल-अकोला महामार्गावर स्थित बहिरम हे तीर्थक्षेत्र यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. माधान ही संत गुलाबराव महाराज यांची जन्मभूमी तसेच मोझरी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ नागपूर-अमरावती महामार्गावर आहे. ही महत्त्वाची स्थळे जोडण्यासाठी दोन्ही महामार्ग जोडण्यासह बहिरम, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, चांदूर बाजार, माधान, बेलोरा, राजुरा, मोझरी या सुमारे ५० किमीच्या नवीन महामार्गाकरिता १५० कोटींच्या मान्यता व निधी प्रदान करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी यंत्रणेला दिले.
चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, केंद्रीय वनविभागाद्वारे काही परवानग्या मिळण्यात अडथळे येत आहेत. याबाबत आवश्यक मान्यता लवकरात लवकर प्रदान करण्यात येतील. परवानगीची प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासनाला दिले. फिनले मिल सुरू होण्याबाबतही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली.