करजगावातील रस्त्याची पंधरा दिवसांत फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:32+5:302021-03-23T04:13:32+5:30
करजगाव : प्रभाग ४ जेबी प्लॉटमधील रस्त्याची बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करीत ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ...
करजगाव : प्रभाग ४ जेबी प्लॉटमधील रस्त्याची बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करीत ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून अडीच लाखांचा रस्ता मंजूर केला. रस्त्याचे कामही सुरू झाल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु, रस्ता निर्माण होऊन पंधरा दिवसच झाले तोच हा रस्ता जागोजागी फुटला. यावेळी रस्त्यावर वाहतूकही नीट प्रकारे सुरू झाली नाही. त्यामुळे रस्ता बांधकाम किती दर्जाहीन झाले, याचा पुरावाच नागरिकांपुढे उघड झाला.
रस्त्याच्या कडेला सतत सुरू असणारा सार्वजनिक पाणीपुरवठा करणार नळ असूनही रस्त्यावर पाणी टाकण्यात आले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे हितसंबंध रस्त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत असल्याचे नागरिक बोलत आहेत. संबधित कामाच्या निविदा कधीतरी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकांतून जाहीर केल्या जातात, जेणेकरून अन्य ठेकेदारांना सदर निविदेविषयी माहिती होणार नाही. नागरिकांमध्ये या रस्त्याबाबत रोष व्यक्त होत आहे.