रस्ता खड्यात की खड्डे रस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:45+5:302021-06-16T04:17:45+5:30
तळेगाव दशासर : स्थानिक गावातील प्रभाग क्र. ६ मधील पाण्याची टाकी ते शहीद दीपक ठाकरे चौक रस्त्यावर मोठे ...
तळेगाव दशासर : स्थानिक गावातील प्रभाग क्र. ६ मधील पाण्याची टाकी ते शहीद दीपक ठाकरे चौक रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांसाठी असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात दलदल होत असल्याने घराबाहेर पडणेच कठीण झाले आहे. रस्त्यावरील चिखलामुळे घसरगुंडीचे चित्र निर्माण झाले आहे.
सदर रस्ता हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे तसेच बांधकाम विभागाचे व पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. परिणामी दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याला सुरुवात होताच या रस्त्यावर ग्रामस्थांना पायी चालणेही कठीण होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर नवदुर्गा बँक, स्टेट बँक व गावातील सर्वात मोठा जयस्तंभ चौक असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात चिखलामुळे रस्ता असूनही वाट शोधावी लागते. अनेक दुचाकी वाहने चिखलामुळे घसरून जखमी झाले आहेत. एकीकडे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट उदयास येत असताना, ग्रामीण भागातील रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गावातील रस्ता चालण्यायोग्य करून द्यावे, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.