पावसाने रस्त्यांची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:12 PM2019-07-29T23:12:22+5:302019-07-29T23:12:39+5:30
शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे.
शहरात २४ तासांत २२ मिमी पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांपासून झड आहे. यात मधेमधे जोराचा पाऊस होत असल्याने शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले आहे. यामध्ये नाल्यांची सफाई झाल्याने पाणी तुंबले नसले तरी यावेळी रस्त्यांचे नवीन संकट ओढावले आहे. रस्त्यांची कामे करताना चौकाचौकांतील काँक्रीटीकरण सोडण्यात आले. त्यामुळे या खोलगट भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहन चालविताना खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचा तोल गेल्याने वाहनासह पडल्याचे अपघाताच्या घटना घडल्या.
अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्याने रस्त्यांची चाळण झाली व या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने अंदाज येत नसल्यानेही वाहनचालकांना अपघात होत आहेत.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करणे अनिवार्य असताना शहरात सर्वच नियमांना हरताळ फासला गेला आहे. महापालिका की सार्वजनिक बांधकाम विभाग, यामध्ये रस्त्यांची विभागणी झाल्यामुळे दोन्ही विभागांद्वारे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भर पावसाळ्यात अमरावतीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सत्र केव्हा थांबेल, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्ती कागदावरच
दरवर्षी महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. मात्र, यंदा पावसाळा दीड महिना उशिराने सुरू झाला असतानाही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. हे खड्डे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरणारे आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे खड्ड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असताना ती का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे.