रस्त्यासह संरक्षण भिंतीच्या कामात अपहार
By Admin | Published: November 5, 2015 12:27 AM2015-11-05T00:27:24+5:302015-11-05T00:27:24+5:30
तालुक्यात येणाऱ्या चुनखडी, खडीमल व माडीझडप गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता व सुरक्षाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
७५ लाखांमधून सुरू होते बांधकाम : खडीमल चुनखडीच्या कामाची तक्रार
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे चिखलदरा
तालुक्यात येणाऱ्या चुनखडी, खडीमल व माडीझडप गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्ता व सुरक्षाभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. लाखांमधून सुरू असलेल्या हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते वेळेपूर्वीच जीर्ण झाल्याचे उघडकीस आले आहे.
चुनखडी फाटा ते खडीमल व तेथून माडीझडप गावापर्यंत एफडीआर निधीअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व संरक्षण भिंतीचे काम मार्च ते एप्रिल- २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत प्रमोद मालवीय नामक कंत्राटदाराने हे काम केल्याची तक्रार भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल येवले यांनी जि.प. कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. उपरोक्त या कामाची अंदाजे किंमत सिमेंट रस्ता ४० लक्ष तर सुरक्षा भिंत ३५ लक्ष रुपये अशी जवळपास ७५ लक्ष रुपये आहे. इतका निधी यावर खर्च करण्यात आला. मात्र, हे काम वेळेपूर्वीच जीर्ण झाल्याने या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे जि.प.बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
पुन्हा काम करण्याची सवय
ही गावे व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने येथे डांबरीकरणाचा रस्ता तयार करता येत नाही. याचा फायदा घेत कंत्राटदार मोठ्या प्रमाणात निकृष्ट कामे करतात. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीची बनावट देयके टाकून लाखोंचा भ्रष्टाचार संबंधित अभियंत्याच्या संगनमताने करित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नियम धाब्यावर
७५ लक्ष रुपयांचे काम अतीदुर्गम चुनखडी, खडीमल व माडीझडप या आदिवासी गावांच्या विकासासाठी महत्वपूर्ण असताना या कामात सर्व शासकीय नियम धाब्यावर बसविण्यात आलेत. इतकेच नव्हे तर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करताना सिमेंटचा वापर कमी करण्यात आला. त्यामुळे रस्त्याचा दर्जा घसरल्याचे दिसून येत आहे.
पीआरसीकडे
तक्रार करणार
जिल्हा दौऱ्यावर येत असलेल्या पंचायत राज समितीपुढे संबंधित कामाची तक्रार करणार असल्याचे काँग्रसेचे महासचिव राहुल येवले यांनी सांगितले. कार्यकारी अभियंत्यांना या संदर्भात तक्रार करण्यात आली असून त्यांनी अद्याप याबाबत कुठलीच चौकशी केली नसल्याचा आरोप राहुल येवले यांनी केला आहे.
संबंधित निकृष्ट कामाची चौकशी करुन कंत्राटदार व अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी पीआरसीकडेसुध्दा याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल.
- राहुल येवले
तक्रारकर्ता, चुरणी
ता. चिखलदरा
हे काम योग्य असल्यानेच त्याचे देयक देण्यात आले आहे. यात कुठल्याच प्रकारचा अपहार झालेला नाही. कामाचा दर्जा उत्तम आहे.
- पी.जी. भागवत
कार्यकारी अभियंता
जि.प. बांधकाम विभाग, अमरावती