मेळघाटातील रस्ते, आरोग्यासंदर्भात ना. गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:02 AM2021-07-13T04:02:54+5:302021-07-13T04:02:54+5:30
प्रभुदास भिलावेकर यांनी घेतली भेट, ॲम्ब्युलन्स मिळणार परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य आणि अतिदुर्गम आदिवासी पाड्यांना ...
प्रभुदास भिलावेकर यांनी घेतली भेट, ॲम्ब्युलन्स मिळणार
परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य आणि अतिदुर्गम आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे वनविभागाच्या परवानगीअभावी अडकली आहेत. त्यासाठी मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी भेट घेतली. मेळघाटमधील रस्ते, पूल वनविभागाची परवानगी न मिळाल्याने विकासकामे रखडली आहेत. ही कामे लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. लवकरच केंद्रीय स्तरावर बैठक लावून परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर मेळघाटात आरोग्य यंत्रणेसाठी अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स देण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली. लवकरच ॲम्ब्युलन्स देण्याचे आश्वासन मिळाले. यावेळी भाजपचे विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन कोल्हे उपस्थित होते.