वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 06:16 PM2024-01-24T18:16:53+5:302024-01-24T18:17:26+5:30

आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

robbed the old man; The fake was caught by the real police in half an hour | वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले!

वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले!

अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धाला २५ हजार रुपयांनी गंडविणाऱ्या तोतयाला कोतवाली पोलिसांनी अवघ्या अध्या तासात पकडून कोठडीत टाकले. तोतयेगिरीची ती घटना २४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इतवारा बाजार परिसरात घडली. घटनेनंतर त्वरेन अटक करण्यात आलेल्या त्या तोतयाकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे.

तक्रारीनुसार, रामगाव येथील रहिवासी ताराचंद श्यामराव पाचपोर (६४) यांनी वलगाव येथून एका बँकेतून २५ हजार रुपये काढले. त्यानंतर ते ऑटोने अमरावती शहरातील चित्रा चौकात आले. तेथून ते पायदळ इतवारा बाजारकडे जात होते. बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आजम खानने त्यांना अडविले. आपण पोलीस असून या भागात तपासणी सुरू असल्याची बतावणी त्याने केली. त्याने ताराचंद यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला नेले. त्याचवेळी त्याने तपासणीच्या नावावर हातचलाखी करून ताराचंद पाचपोर यांच्या खिशातून २५ हजारांची रोकड लांबविली. त्यानंतर त्याने ताराचंद यांना सोडून दिले. थोड्यावेळाने खिशातील रोकड लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर ताराचंद यांना त्या तोतयावर संशय आला. त्यामुळे त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

अंबादेवी रोडवरील लॉजमध्ये मुक्काम
तक्रारीवरून शहर कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी तातडीने तपासचक्रे फिरवित एका तासाच्या आत सरोज चौक येथून तोतया आजम खानला अटक केली. त्याच्याकडून १० हजारांची रोकड देखील जप्त करण्यात आली. आजम खान हा गेल्या काही दिवसांपासून शहरातील एका लॉजमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे त्याने शहरात आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, मोहम्मद समीर, मंगेश दिवेकर, सागर ठाकरे यांनी केली.

तीन आठवड्यात चार घटना
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील पंचवटी चौक परिसरात शंकर उदयभान सोनोने (७०, रा. यशोदानगर) यांना पोलीस असल्याची बतावणी करून तोतयाने ९ हजार रुपयांनी गंडविले होते. ही घटना २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली होती. हा गुन्हासुद्धा आजम खानने केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यापुर्वी, २७ डिसेंबर २०२३ रोजी पीडीएमसीसमोर एका ६८ वर्षीय वृद्धाकडून हातचलाखीने १५ हजार रुपये लुटण्यात आले होते. त्यानंतर २८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी देखील तोतया पोलिसाने वरूडा येथील वृध्दाकडून १० हजार रुपये हातचलाखीने नेले होते.
 

Web Title: robbed the old man; The fake was caught by the real police in half an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.