-अन् बिबट्याच्या तावडीतून रोही बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:18 AM2018-04-03T00:18:35+5:302018-04-03T00:18:35+5:30
वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
वडाळी-चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी-पोहरा जंगलात वाघांची संख्या नगण्यच. एक पट्टेदार वाघ होता, तोही प्रतिकूल वातावरणामुळे जंगलातून निघून गेला. त्यामुळे आता या वनपरिक्षेत्राचे राजे बिबटच आहे. चिरोडी-पोहरा-माळेगाव-वडाळी या वर्तुळ वनक्षेत्रात गतवर्षी मे महिन्यात १६ बिबटच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर वरूडच्या जंगलात वनकर्मचाºयांचा चक्क बिबटाशी सामना झाल्याने भीतीचे सावट पसरले आहे. या जंगलात बिबट्यांचा वावर व त्यांची संख्या वाढल्याने वनविभाग सतर्क झाला. बिबट्यासाठी हा परिसर नवखा नाही. त्यामुळे या परिसरात बिबट बिनधास्त संचार करीत असून वडाळी, पोहरा व चिरोडी जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना लागणारे आवश्यक खाद्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने बिबट या जंगलात रममान झाले आहेत. बिबट अमरावती-चांदूररेल्वे मार्ग ओलांडून जंगलात भ्रमण करीत असल्याने या मार्गावर काही गतिरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाईल, वनाधिकाºयांनी सांगितले. या जंगलात बिबट्यांसह रोही, हरिण, सांबर, चित्तळ, रानडुकरांची संख्या वाढल्याने वन्यजीवांसाठी पोषक वातावरण आहे. चिरोडी, मालेगाव, मार्डा, कारला, सावंगा विठोबा, मालखेड, लालखेड, कस्तुरा, मोगरा, भानखेडा, हातला, बोडणा, इंदला, घातखेडा, पिंपळखुटा, पोहरा, वडाळी या भागात बिबट्यांची संख्या १६ ते १९ च्या जवळपास असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. ही संख्या समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जात असल्याने या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्रातून बाहेर काढून अभयारण्याचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.