डोळ्यात मिरची पूड टाकून लुटमार करणारी टोळी जेरबंद; पाच गुन्हयांची कबुली
By प्रदीप भाकरे | Published: April 10, 2024 06:43 PM2024-04-10T18:43:14+5:302024-04-10T18:43:57+5:30
अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले.
अमरावती: डोळयात मिरची पूड टाकून लुटमार करणारी चार जणांची टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. १० एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. अटक चारही आरोपींकडून तीन मोटार सायकल आणि चार मोबाईल असा एकुण २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे मंगरूळ दस्तगिर, तळेगाव शामजीपंत, यवतमाळातील आर्णी येथील प्रत्येकी एक व बाभुळगाव पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण पाच गुन्हे उघड झाले.
शुभम अनिलराव गोपाळे (२४ वर्ष), रितीक रामदास गोपाळे (२३, दोन्ही रा. गोकुळसरा, ता. धामणगाव रेल्वे), सागर लक्ष्मण पधारे (२३, रा. बोरगाव निस्ताने) व मंगेश सुकलाल ठाकरे (२८ वर्ष रा. पेठ रघुनाथपुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघेही धामणगाव रेल्वे तालुक्यातील आहेत. निंबोरा बोडका येथील शेषराव डोंगरे (वय ६६ वर्ष) हे ५ एप्रिल रोजी सांयकाळी मंगरूळ दस्तगीर येथून निंबोराकडे जात असताना आरोपींना ट्रिपल सिट येत त्यांच्या मोपेडला धक्का देऊन खाली पाडले. तथा त्यांच्या डोळयात मिरची पूड टाकुन चाकुचा धाक दाखवत ६० हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. त्याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सागर हटवार व नितीन चुलपार यांचे दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
लुटमार चोरीच्या दुचाकीने
आरोपींचा शोध घेत असता उपनिरिक्षक हटवार यांच्या पथकाला शुभम गोपाळे हा पुर्वी एका फायनान्समध्ये काम करीत होता, त्याची हालचाली संशयास्पद असून तो सध्या त्याच्या साथीदारासह विटाळा येथे माहिती मिळाली. त्याआधारे गोपाळेसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी लुटमार व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. लुटमार करण्यासाठी प्रथम त्यांनी बाभुळगांव हद्दीतून दोन मोटार सायकल चोरल्या. त्यांनी ४ एप्रिल रोजी तळेगाव शामजीपंत हददीत फायनान्सचे कर्मचाऱ्याच्या डोळयात मिरची पुड टाकून त्याला दिड लाखांनी लुटले. दुसऱ्या दिवशी मंगरूळ दस्तगीर हददीत शेषराव डोंगरे यांना लुटले.
यांनी केली कामगिरी
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षकद्वय सागर हटवार व नितीन चुलपार, मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, भुषण पेठे, रविंद्र बावणे, सचिन मसांगे, पंकज फाटे तसेच पो.स्टे. सायबर येथील अंमलदार सागर धापड, चेतन गुन्हाने, रितेश वानखडे, सारिका चौधरी, संजय प्रधान, निलेश येते ही कारवाई केली.