विशेष रेल्वेची लूट; ४४ कि.मी.वरील धामणगावसाठी १०० कि.मी.चे भाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:20+5:302021-08-01T04:13:20+5:30
दुसऱ्या रेल्वेला ४५ रुपये, स्पेशल ट्रेनला १७५ रुपये भाडे अमरावती : कोरोना काळात रेल्वे बंद होत्या. आता काही महिन्यांपासून ...
दुसऱ्या रेल्वेला ४५ रुपये, स्पेशल ट्रेनला १७५ रुपये भाडे
अमरावती : कोरोना काळात रेल्वे बंद होत्या. आता काही महिन्यांपासून विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. मात्र, विशेष रेल्वेच्या नावाखाली १०० अथवा २०० कि.मी.चे भाडे आकारले जात आहे. बडनेरा ते धामणगाव रेल्वे असा प्रवास करायचा असल्यास ४४ कि.मी. अंतरासाठी चक्क १०० कि.मी.चे भाडे प्रवाशांना द्यावे लागत आहे.
रेल्वेच्या या अफलातून निर्णयाने सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत असल्याचे वास्तव आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल एक्स्प्रेस, पॅसेंजर बंद केल्यामुळे कमी अंतरावरील रेल्वे स्थानक गाठण्यासाठीही विशेष गाड्यांनीच प्रवास करावा लागतो. पर्याय नसल्याने खिशाला चाट देत लांब कि.मी.चे भाडे देऊन रेल्वेने ये-जा करावी लागत आहे. काही विशेष रेल्वेच्या नियमानुसार १०० अथवा २०० कि.मी.चे भाडे आकारल जात आहे. परिणामी विशेष रेल्वेने प्रवास नकाे रे बाबा, असे म्हणण्याची अनेकांवर वेळ आली आहे.
अकोला, मूर्तिजापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे अशा नजीकच्या प्रवासासाठी जादा भाडे मोजावे लागत आहे,
----------
अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
०२११२ अमरावती- मुंबई एक्स्प्रेस
०२७६६ अमरावती- तिरुपती एक्स्प्रेस
०२११८ अमरावती- पुणे एक्स्प्रेस
०२८१० मुंबई - हावडा मेल
०२१०६ गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
०२२६० हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस
०२२८० हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस
----------------
८० टक्के तिकिट जास्त
- ०२ क्रमांकाने प्रारंभ होणाऱ्या रेल्वेला अलीकडे विशेष दर्जा बहाल करण्यात आला आहे. या गाड्यांना १०० ते २०० कि.मी.चे भाडे आकारून आरक्षण तिकीट मिळते. जवळील थांबा असला तरी हेच भाडे अदा करावे लागतात.
- हावडा-पुणे, अहमदाबाद- चैन्नई, हावडा- मुंबई गीतांजली, मुंबई- हावडा मेल, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस या विशेष रेल्वेला ८० टक्के भाडे जास्त
- विशेष रेल्वेचे भाडे परवणारे नाही. त्यामुळे एसटी, खासगी गाड्यांनी गाव जवळ करावे लागते. पॅसेंजर, जनरल रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा
--------------------------
किमान १००
कमाल २००
कि.मी.चा फाॅर्म्युला
१) बडनेरा येथून चांदूर रेल्वे स्थानकावर जायचे असल्यास ३० कि.मी. अंतरासाठी १०० कि.मी.चे भाडे द्यावे लागते. जनरल रेल्वेसाठी ३० रुपये भाडे लागते. मात्र, विशेष रेल्वेला १७५ रुपये भाडे लागते.
२) बडनेरा ते मूर्तिजापूर हे ३० कि.मी. अंतर आहे. रेल्वे जनरल तिकीट भाडे ३० रुपये लागतात. मात्र, विशेष अथवा सुपरफास्ट रेल्वेसाठी तिप्पट भाडे द्यावे लागत आहे. ही बाब सामान्य प्रवाशांसाठी आर्थिक लूट करणारी आहे.
-------------------
प्रवासी वैतागले
‘‘ विशेष रेल्वे प्रवास भाडेवाढ ही सामान्यांची कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे जनरल, पॅसेंजर गाड्या लवकरच सुरू झाल्या पाहिजे. त्यामुळे नजीकच्या रेल्वे स्थानकावर कमी खर्चात प्रवास करता येईल.
- विकास डोंगरे, प्रवासी
‘‘कोरोना आता कमी होत आहे. त्यामुळे पॅंसेजर रेल्वे सुरू व्हाव्यात, अशी मागणी आहे. विशेष अथवा सुपरफास्ट गाड्यांनी प्रवास करणे शक्य नाही. रेल्वे तिकिट भाडे सामान्य गाड्यांपेक्षा तिप्पट आहे.
- दयाराम ग्वालानी, प्रवासी.
---------------------
ही लूट कधी बंद होणार?
‘‘ रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार विशेष रेल्वेचे भाडे आकारले जात आहे. यात काही रेल्वेंना १०० ते २०० कि.मी.चे भाडे घेण्यात येत आहे. तिकीट केंद्रावर कोणताही कर्मचारी मर्जीप्रमाणे भाडे आकारत नसून, रेल्वेच्या नियमानुसारच भाडे घेत आहे. तूर्त पॅंसेजर, जनरल एक्स्प्रेस गाड्या सुरू होण्याचे आदेश प्राप्त नाही.
- महेंद्र लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती