अमरावती जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या रोह्याची २३ तासानंतर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:09 PM2019-02-06T12:09:35+5:302019-02-06T12:11:31+5:30
तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तालुक्यातील शिवणगाव फत्तेपूर शिवारातील कोरड्या खचलेल्या विहिरीत एक वयस्क रोही पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता उघडकीस आली होती. रोह्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चालविलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना २३ तासांनंतर यश आले. मंगळवारी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून रोह्याला जीवदान दिले. यावेळी त्याला बेशुद्ध करण्यात आले होते.
दिलीप नारिंगे (रा. शिरजगाव फत्तेपूर) यांच्या शेतातील २० फूट खोल कोरड्या विहिरीत एक रोही पडल्याचे एका शेतकऱ्याला दिसले. याची माहिती तिवसा वनविभागाला देण्यात आली होती. रोह्याला बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्रीच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विहीर अडगळीच्या ठिकाणी असल्याने प्रयत्न थांबविले. मंगळवारी सकाळी तिवसा येथील वनविभागाने पुन्हा प्रयत्न केले. मात्र, त्यांना शक्य न झाल्याने अमरावती येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. विशेष रेस्क्यू आॅपरेशन दरम्यान रोह्याला ट्रँक्यूलायझरने बेशुद्ध करण्यात आले आणि क्रेनच्या मदतीने दुपारी ३.४५ वाजता विहिरीतून रोह्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
असे पार पडले ऑपरेशन
बेशुद्ध केलेल्या रोहीला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली होती. यावेळी क्रेनच्या मदतीने वनविभागाचे जवान विहिरीत उतरले होते. यावेळी त्यांनी जिवाची बाजू लावली.
यांनी केली कामगिरी
१५ जणांच्या चमूने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. तिवसा वनरक्षक गोविंद येवले, गजानन लादे, मनोहर वणवे, पशुवैद्यकीय अधिकारी अतुल खेरडे, रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर, चंद्रप्रकाश मानकर, रवींद्र उज्जैनकर, सतीश उमप, वैभव राऊत, मनोज ठाकूर, फिरोज खान आदींनी परिश्रम घेतले. विहीरीतून बाहेर काढताच रोह्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
रोहीला इजा पोहोचू नये ही खबरदारी घेण्यात आली. विहीर खोल व अडगळीच्या ठिकाणी होती. त्यामुळे मोठ्या परिश्रमानंतर रोह्याला बाहेर काढण्यात आले.
गजानन लादे, वनरक्षक, तिवसा