रोही, रान डुक्कर, हरणाच्या कळपांचा पिकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:59+5:302021-07-22T04:09:59+5:30
फोटो पी २१ जावरे पान १ लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे ...
फोटो पी २१ जावरे
पान १
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे पेरणी खोळंबली होती. ज्यांनी पेरणी केली त्यांना आभाळाकडे पाहण्याची वेळ आली. पाऊस आला, पेरलेले उगवले तर आता रोही, हरिण, रानडुकरांनी कळपाने पिकावर हल्ला केला. रात्रीतून पेरणी केलेले सोयाबीन, तूर व इतर पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. डोळ्यादेखत कोवळ्या पिकांवर हल्ला होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यासदर्भात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तांबसवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील तांबसवाडी, तळणी, राजना पूर्णा परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीला दोनशेपेक्षा अधिक संख्येने या वन्यप्राण्यांचा कळप पीक फस्त करीत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. यासंदर्भात वनविभागाला तक्रार दिली असून, बंदोबस्ताची मागणी शुभम माहोरे, गोकुल पोहकार, किशोर माहोरे, सुनील महोरे, अजय महोरे, योगेश माहोरेसह शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
एकाच फटक्यात दोन, तीन एकरातील पीक शेत फस्त
रात्रीला २०० ते ३०० संख्येने वन्यप्राणी कळपाने शेतात शिरतात. एकाचवेळी दोन ते तीन एकरातील पीक फस्त करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
मारले तर गुन्हा, पीक खांल्ले त्याचे काय?
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वारंवार निवेदन दिले. शेतकऱ्याने रोही, रानडुक्कर, हरणाला मारले तर वनविभाग गुन्हा दाखल करतो. परंतु घाम गाळून व रात्रंदिवस राबराब राबून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी फस्त करीत आहे त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त
तांबसवाडी व परिसरात शेकडोंच्या संख्येने येणारे रोही परिसरात असलेल्या बघाडी प्रकल्प, व तळणी पूर्णा परिसरातून झुडपी जंगल आहे तेथून शेतात शिरतात दुसरीकडे अचलपूर तालुक्यातील पथ्रोट,टवलार, दर्यापूर व अंजनगाव परिसरात वन्य प्राणी रोही हरिण रानडुकरांचा त्रास असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप बोर्डे यांनी दिली.
बॉक्स
मारण्यावर बंदी, नुकसान भरपाईचा आदेश
या वन्यप्राण्यांना मारण्याची शासनाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना परवानगी दिली होती. मात्र, वन्यप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे त्यावर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून शेतीला श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून दहा शेतकऱ्यांच्या गटाला दहा टक्के रक्कम तार कुंपणासाठी दिली जाते. झालेल्या नुकसान संदर्भातच वनविभाग काही रक्कम देत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.
कोट
तांबसवाडी राजवाडा परिसरात शेकडो रोहींचे कळप रात्रीला नुकतेच उगवलेले पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाला त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.
- शुभम माहोरे,
शेतकरी, तांबसवाडी
कोट
दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील ग्रामीण भागात रोही, हरिण, रानडुक्कर, काळवीट आदींचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तांबसवाडी परिसरातील तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्यात येईल.
- प्रदीप भड,
वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा