आजपासून पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:02+5:302021-05-25T04:13:02+5:30

सोबतच आजपासून नऊ दिवस नवतपा मृगावर नजर : पान ३ ची लीड लोकमत न्यूज नेटवर्क चांदूरबाजार : ग्रह-ताऱ्यांवर ...

Rohini constellation of rain starts from today | आजपासून पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरुवात

आजपासून पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरुवात

Next

सोबतच आजपासून नऊ दिवस नवतपा

मृगावर नजर :

पान ३ ची लीड

लोकमत न्यूज नेटवर्क

चांदूरबाजार : ग्रह-ताऱ्यांवर आधारित नक्षत्रनिहाय पावसाचा अंदाज वर्तविणे, ही भारतीयांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. भारतीय पंचांग शास्त्राने देशातील चार महिन्यांच्या पावसाळ्याची एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. त्याप्रमाणे नक्षत्रनिहाय ग्रह-ताऱ्यांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तविण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्यानुसार पावसाचे पहिले महानक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. पावसाच्या या पहिल्या रोहिणी नक्षत्राला आज (मंगळवार)पासून सुरुवात होत आहे.

पावसाळ्यापूर्वीच येणाऱ्या या महानक्षत्राचे वाहन मेंढा असून, मंगळवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे. सूर्याच्या नक्षत्र प्रवेशावेळी एकही जलकारक ग्रह जलराशीत नसल्याने या नक्षत्रात कमी पावसाचे योग दर्शवितात. २५ मेला होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रात दिसणार नसले, तरी हे चंद्रग्रहण पावसासाठी थोडीफार अनुकुलता दर्शविते. त्यायोगे दि. २६ व २७ मे दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून, वारा, वादळासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागेल.

या नक्षत्रात केरळ व राज्यातील समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागात कोकण, मुंबई परिसरात वादळी पावसाची शक्यता संभवते. दि. २ जूननंतर उष्णतामान कमी होऊन थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, नियमित व सार्वत्रिक पाऊस या नक्षत्रात होण्याचे योग दिसत नाहीत. तसेच दर्शविण्यात आलेला हा पावसाचा अंदाज पंचांग शास्त्रानुसार, ग्रह व नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित आहे. तरीही शेतकरीवर्गाने हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजावर आधारित आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे.

या रोहिणी नक्षत्रासोबतच आजपासून नवतपाला सुरुवात होत आहे. त्यामुळे हे नऊ दिवस सर्वाधिक तापमानाचे राहण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानामध्ये सतत बदल होत राहिला. कधी अवकाळी वादळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे उन्हाळा फारसा जाणवला नाही. परंतु, घाम फोडणाऱ्या ‘नवतपाला’ मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस चांगलेच ‘ताप’दायक असणार, हे नक्की. कारण उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान असणारे दिवस, असा नवतपाचा लौकिक आहे. या दिवसांत हवा व जमिनीचे उष्ण तापमान सर्वात जास्त असते.

नवतपाच्या या नऊ दिवसांचा संबंध पुढे येणाऱ्या पावसाच्या नऊ नक्षत्रांसोबत जोडलेला आहे. जर नवतपा कालावधी ठरल्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला, तर त्यावर्षी पाऊस उत्तम बरसतो. याउलट नवतपातील नऊ दिवसांत ज्यादिवशी तापमान कमी असेल तसेच गारवा किंवा पाऊस पडल्यास, त्या दिवसाच्या संबंधित पावसाचे नक्षत्र कोरडे जाते किंवा त्या नक्षत्रात पाऊस कमी पडतो, असा जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज आहे. नवतपाच्या दिवसनिहाय येणारी पावसाची नऊ नक्षत्रे पुढीलप्रमाणे आहेत. मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही ती नऊ नक्षत्रे आहेत.

नवतपा म्हणजे काय?

चंद्राला केंद्रस्थानी ठेवून वर्षभर सूर्याचे भ्रमण, एकूण सत्तावीस नक्षत्रांमधून होत असते, असे पंचांग शास्त्र सांगते. त्यानुसार वर्षाचे ३६५ दिवस २७ नक्षत्रांमध्ये विभागले आहेत. ते विविध १२ राशींच्या अंतर्गत येतात. सरासरी एका नक्षत्राचा कालावधी हा १३ दिवसांपेक्षा थोडा अधिक असतो. सूर्याचा ‘रोहिणी नक्षत्रा’मध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे ‘नवतपा’ होय. या नवतपाच्या काळात सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो. त्यामुळे भारतात तापमान वाढ आणि उन्हाळा हा ऋतू उच्चतम स्थितीमध्ये असतो. नवतपामधील वातावरण तसेच पाऊस घेऊन येणारे नक्षत्र यांचा स्थानिक परिणाम प्रत्येक गाव/ स्थान/ ठिकाण यांच्या केंद्रापासून ५० किलोमीटरच्या परिघात अनुभवता येतो, असे स्थानिक हवामान सांगणाऱ्या जाणकारांचे मत आहे.

Web Title: Rohini constellation of rain starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.