रोहित्र जळल्याने धारणीत पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:36+5:302021-05-12T04:13:36+5:30
: नगर पंचायत, विद्युत वितरण विभागाचे दुर्लक्ष फोटो पी ११ धारणी पंकज लायदे धारणी : नगर पंचायतच्या पाणीपुरवठा ...
: नगर पंचायत, विद्युत वितरण विभागाचे दुर्लक्ष
फोटो पी ११ धारणी
पंकज लायदे
धारणी : नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेची विद्युत लाइन असलेले रोहित्र चार दिवसांपूर्वी जळाल्याने येथील सात प्रभागांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार दिवसांनंतरही रोहित्र बसविण्यात आले नसल्याने धारणी नगर पंचायत व महावितरणमधील असमन्वये चव्हाट्यावर आला आहे.
रोहित्र जळल्याने नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र. एक, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, या एकूण सात प्रभागांतील पाणी पुरवठा योजना बंद पडली. तीन हजार नागरिकांच्या घरात नळाद्वारे येणारा पाणीपुरवठा बंद झाला. याकडे नगर पंचायत प्रशासन व विद्युत वितरण विभागाचे असभ्य दुर्लक्ष असल्याचे सुंदर दृश्य पाहावयास मिळत आहे. पाणीपुरवठ्याच्या याच रोहित्रावर त्या परिसरातील शेती व घरगुती अशा ३० जोडण्या आहेत. त्यामुळे तेथे कमी दाबाचा विद्युत पुरवठा मिळतो. त्या कारणाने दोन वर्षांआधी या रोहित्राला अचानक आग लागली होती. त्यावेळी तेथील नागरिकांनी प्रशासनाला दुसरे रोहित्र देण्याची मागणी केली होती; परंतु नगर पंचायत व विद्युत वितरण विभागाने ‘रात गई बात गई’ असे धोरण अवलंबविले होते. त्याचा फटका सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
बॉक्स
सहा मोठे कनेक्शन
नगर पंचायतच्या सात प्रभागांत जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत पुरवठा या रोहित्रावर आहे. नगर पंचायतीने शेतकरी सुखदेव मावस्कर, बाबूलाल मावस्कर यांच्या शेतातील दोन बोअर अधिग्रहित केल्या. तर आलेख पारकर यांच्या शेतातील बोअर, नगर पंचायतने नव्याने केलेली बोअर व पाणीपुरवठ्याच्या सरकारी विहिर अशा पाणीपुरवठ्याची एकूण सहा जोडण्या याच रोहित्रावर असल्याने एकाच वेळी सर्वच पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.