भय्यू महाराजांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित
By admin | Published: September 21, 2016 12:08 AM2016-09-21T00:08:45+5:302016-09-21T00:08:45+5:30
समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे.
सूर्योदय परिवार : मानवतेच्या भूमिकेतून अत्याचाराच्या मुद्याला हात
अमरावती : समाजातील काही घटकांनी भय्यू महाराजांवर आरोप करणे सुरू केले असून त्यांची भूमिका कोपर्डीपुरतीच मर्यादित असल्याचा दावा सूर्योदय परिवाराने केला आहे. राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा मोर्चाशी महाराजांचा संबंध जोडला जात असल्याने ते प्रचंड उद्विग्न झाल्याचे हेमंत देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.
यासंदर्भात भय्यू महाराजांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्याच सूचनेनुसार आपण त्यांच्यावरील आरोपांचा स्पष्ट इन्कार करीत असल्याची भूमिका देशमुख यांनी मांडली. भय्यू महाराजांनी केलेले निवेदनही माध्यमांना देण्यात आले.
मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, ते त्यांनी सरकारशी बोलून सोडवावेत, त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, कोपर्डीतील त्या अभाग्या मुलीला न्याय मिळावा व दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी भय्यू महाराजांची भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानवतेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या कोपर्डीच्या प्रश्नाला कुणाच्याही स्वार्थापायी विभत्स वळण लागावे, हा त्या मुलीच्या मातेचा व त्या अभागी कन्येच्या वेदनेचा अपमान असल्याचे महाराजांना वाटते. कोपर्डीतील ती घटना समजताच महाराज तातडीने तेथे गेले, त्या दु:खी कुटूंबाला आध्यात्मिक बळ देण्याबरोबरच शाळेत जाण्यास घाबरणाऱ्या तेथील मुलींसाठी चार बसेस दिल्यात. मात्र, त्यांच्यावर प्रसिद्धी, पैसा व श्रेय लाटण्यासोबतच भांडवलदारीचे खोटे आरोप करण्यात आलेत. ते आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचे आव्हान महाराजांनी दिल्याचे यावेळी पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
आमचा अजेंडा कोपर्डीच
आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि कोपर्डीच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या आहेत. तो प्रश्न मराठा समाजाने वेगळा सोडवावा,अशी स्पष्ट भूमिका भय्यू महाराजांनी घेतल्याचे हेमंत देशमुख यांच्यासह डॉ.राजेश शेरेकर, राजू सुंदरकर, जयसिंग देशमुख, ऋषिकेश वैद्य, रवि देशमुख यांनी यावेळी सांगितले.