शेती विकून उभारले वृद्धांसाठी ‘विसाव्या’चे छत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:46 PM2017-12-31T23:46:54+5:302017-12-31T23:47:07+5:30
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : मागे कुणी नसताना केवळ दुसऱ्यांच्या सुखासाठी झिजणाऱ्या कामिनी अवधूत यांच्या पुढाकाराने विसावा वृद्धाश्रमाची इमारत साकारण्यात आली. सुमारे चार वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुुक्यातील निंबोरा बोडखा येथील कामिनीबाई अवधूत ढोकणे या विसावा वृद्धाश्रमात राहायला आल्या. त्यांनी लावलेला जिव्हाळा हा कायम स्मरणात राहणारा असल्याचे मत यावेळी वृद्धाश्रमातील त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले.
विसावा वृद्धाश्रमामध्ये कामिनीबाई ढोकने यांची प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कामिनीबाईच्या आठवणीने विसावा वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्ध ओशाळून गेले होते. कामिनीबार्इंनी आपली स्वमालकीची शेती विकून त्यातून आलेल्या पैशातून विसावा वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांच्या निवाऱ्याकरिता इमारत बांधून दिली होती. कामिनीबाईच्या या दानशुरतेने उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होता.
वृद्धाश्रमातील वृद्धांच्या प्रेम व आपुलकीने त्यांचे मन येथे रमले होते. विसावा वृद्धाश्रमातील वृद्धांना राहण्यासाठी सुयोग्य निवारा नसल्याची खंत त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील शेती विकून त्यातून येणाऱ्या पैशातून वृद्धांना राहण्याची सोय व्हावी यासाठी निवाऱ्याचे बांधकाम करून देण्याचा मानस वृद्धाश्रमाचे संचालक भाष्कर कौतिककर, पुंडलिक भुजाडे यांच्याकडे व्यक्त केला. आपल्या निधनानंतर वृद्धाश्रमात आपला अंत्यविधी करावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर कामिनीबार्इंनी आपल्या गावी असलेली शेती विकून वृद्धाश्रमाला भली मोठी इमारत बांधून दिली. त्यांच्या हातूनच या इमारतीचे भूमिपूजनसुद्धा झाले होते. एका वृद्ध म्हातारीचा हा दानशूरपणा पाहून त्यावेळी सर्वजण भारावून गेले होते. त्यानंतर एक वर्षाने १८ डिसेंबर २०१६ रोजी कामिनीबाईचे आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार विसावा वृद्धाश्रमातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्यांची समाधीसुद्धा तेथे बांधण्यात आली.
वृद्धाश्रमात त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा संजय ढोकणे हा संपूर्ण परिवारासह वृद्धाश्रमात उपस्थित होता. संजय ढोकणे हा वृद्धाश्रम संचालक भाष्कर कौतिककर यांच्या हस्ते पुण्यतिथीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी अशोक कनेर, विजय खंडेलवाल, जितेंद्र खंडेलवाल, गावंडे गुरूजी, जवंजाळ, गुल्हाने मॅडम, देवानंद गुळदे, अनूप बेदरकर, सचिन वानखडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.