वरूडकरांना सहा दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 01:28 AM2019-05-11T01:28:29+5:302019-05-11T01:30:23+5:30
एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.
वरूड : एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे.
शहरापासून २६ किमी अंतरावरील जमालपूर येथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दरदिवशी ४० लाख लिटर पाणी आवश्यक आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे ते नियोजन कोलमडले. शहरात दोन जलकुंभ असून, त्यांची संचयक्षमता १३ लाख लिटर आहे. नळजोडणी असलेल्या ग्राहकाला पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळते. गावाबाहेरील नवीन वसाहतीत पाइप लाइन नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६५ हजार २२२ असली तरी २०१९ मध्ये ती एक लाखाच्या घरात आहे. शहरात ९५०० वैयक्तिक नळ व ९२ स्टँडपोस्ट आहेत. त्या स्टँडपोस्टवर महिलांमध्ये होणारी शाब्दिक चकमक नित्याचीच झाली आहे. जमालपूर पंपहाऊसवरून होणारा पुरवठा लोणी, पिंपळखुटा मार्गे येतो. मार्गातील काही शेतकऱ्यांनी व्हॉल्व्ह लीक करून पाणी चोरल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली. परिणामी दोन दिवसांनी येणारे नळ हे पाचव्या ते सहाव्या दिवशी येऊ लागले.
शहराबाहेरील वसाहतीमध्ये अद्यापही नळयोजना पोहोचली नसल्याने आणि या परिसरातील विहिरी आटल्याने तेथे नगर परिषदेने तीन टँकर सुरू केले.
२०० लिटर पाण्यासाठी ५० रुपये
२०० लिटर पाण्याकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत. पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ पहिल्यांदाच आली आहे. लग्नसमारंभात ३० रुपये प्रतिकॅन पाणी विकत घेतले जात आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडल्याने १५ रुपयांचे बाटलीबंद पाणी २० ते २५ रुपयांमध्ये विकले जात आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
शहरातील विहिरी आटल्याने आणि जमालपूर येथे मुबलक पाणीसाठा नसल्याने काटकसरीने वापर करावा. नळाला तोट्या लावा. पंप बसवून पाणी काढू नये. पाण्याचा अपव्यय टाळा. नवीन बांधकाम पावसाळ्यापर्यत बंद ठेवा, असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी आवाहन केले.