रूपाला मिळाले पहिले वेतन, शंकरबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू, १०० टक्के पोलिओग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 08:08 AM2022-10-23T08:08:03+5:302022-10-23T08:08:15+5:30
अचलपूर नगर परिषदेने विकलांग पुनर्वसनात पुढाकार घेत तिला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली आहे.
परतवाडा (जि. अमरावती) : २५ वर्षांआधी पंढरपूर येथील विठोबाच्या पायथ्याशी सापडलेल्या रूपाने पहिला पगार अनाथांचे नाथ शंकरबाबांच्या हाती ठेवताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कारण १०० टक्के पोलिओग्रस्त आणि कमरेपासून दोन्ही पायांनी निकामी असलेल्या या मुलीची काळजी आता मिटली आहे. अचलपूर नगर परिषदेने विकलांग पुनर्वसनात पुढाकार घेत तिला तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिली आहे.
शारीरिक व्यंगामुळे रूपाला तिच्या आई-वडिलांनी पंढरपूर येथे सोडून दिले होते. पोलिसांनी तिचे पालक न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशावरून परतवाडा येथून आठ किमी अंतरावरील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात आजीवन पुनर्वसनाकरिता दिले. शंकरबाबांनी तिला बारावीपर्यंत शिक्षण दिले. बालगृहातील मंजुळा नामक मुलगी ही स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची ने-आण तसेच संपूर्ण विधी व सांभाळ करते. तिच्या शिक्षणाचा खर्च पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केला होता. तिचे आधार कार्डदेखील तयार झाले आहे.
पगार ठेवला बाबांच्या हाती
शुक्रवारी दुपारी ४ वाजता नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्या पगाराच्या रूपाने सहा हजार रुपये तिच्या हाती ठेवले. तो पगार शंकरबाबांच्या हाती तिने ठेवताच त्यांच्या डोळ्यांत परिश्रमाचे चीज झाल्याचे भाव आणि आनंदाश्रू होते. बाबांनी ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना ही आनंद घटना सांगितली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अचलपूर नगर परिषदेबाबत गौरवोद्गार काढले.
जिल्हाधिकारी कौर यांना केली विनंती
रूपाचे बारावीनंतर काय, याची चिंता बाबांना लागली होती. तिला नियमानुसार सज्ञान झाल्यानंतर बालगृहाबाहेर काढणे जरूरी होते. योगायोगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर संस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या तेव्हा माझ्या रूपाला कोणतीही नोकरी देऊन जीवनदान द्या, अशी विनवणी शंकरबाबांनी त्यांना केली. त्यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना बोलावून अचलपूर नगर परिषदेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोकरीचे निर्देश दिले. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी त्यावर अंमल केला आणि आरोग्य विभागात १४ सप्टेंबरपासून काम दिले. रूपा सकाळी १०.३० ते ५ पावेतो नगर परिषदेत नोकरी करते.