...म्हणून नऊ एकरातील सोयाबीन पिकावर फिरवला ट्रॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:45 PM2019-07-26T19:45:11+5:302019-07-26T19:49:12+5:30
जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत.
पापळ (अमरावती) - जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत. परिणामी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंप्री निपाणी येथील शेतकरी हमीदखाँ पठाण यांनी गुरुवारी स्वत:च्या नऊ एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर चालवून अख्खे शेत नांगरून काढले.
पापळ मंडळ अंतर्गत येणाऱ्या पिंप्री परिसरात २० ते २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक वाळले. आता पाऊस येऊनसुद्धा सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी फायदा होणार नाही. त्यामुळे हमीदखाँ यांनी शेत नांगरून टाकले. नऊ एकरांतील सोयाबीन पेरणीस त्यांना ६३ हजार रुपये खर्च आला होता. पिंप्री निपाणी परिसरातील ८० टक्के पीक करपले. या भागाची पाहणी करून संपूर्ण कर्जमाफी व पीकविमा कंपनीला तात्काळ सर्वेक्षणासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी सरपंच विशाल रिठे, हमीदखाँ पठाण, शाहरूख पठाण, शुभम अतकरी, उमेश रिठे, विलास रिठे, गणेश रिठे, समीर पठाण, कुमार थोरात, सलीम पठाण, विलास वाघमारे, सचिन रिठे, गणेश रिठे या शेतकऱ्यांनी केली आहे. तातडीने सर्वेक्षण न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.