तिकीट तपासणी ‘आरपीएफ’कडे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:07 PM2017-09-27T22:07:47+5:302017-09-27T22:08:13+5:30
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांना तिकिट तपासणीचे अधिकार नाहीत, ही बाब रेल्वे विभागाने स्पष्ट केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांना तिकिट तपासणीचे अधिकार नाहीत, ही बाब रेल्वे विभागाने स्पष्ट केली आहे. प्रवाशांना यापुढे आरपीएफकडून नाहक त्रास होणार नाही, अशी काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे विभागाने अर्मयाद अधिकार बहाल केले आहे. त्यामुळे रेल्वे संपत्तीचे रक्षण करताना प्रवाशांचे तिकीट देखिल आरपीएफ तपासत असल्याचा तक्रारीत वाढ झाली होती. त्यानुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाचे अधीक्षकांनी विभागातंर्गत आरपीएफ निरिक्षकांना पत्र पाठवून प्रवाशांकडे तिकीट असल्याबाबतची तपासणी करु नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आरपीएफने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी; परंतु त्यांच्याकडे तिकीट नसल्यास थेट कारवाई करता येणार नाही, असे कळविले आहे. प्लॅटफार्म अथवा गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा असून ही जबाबदारी त्याच यंत्रणेने पार पाडणे अपेक्षित आहे. विनातिकीट प्रवास करताना निदर्शनास आल्यास संबंधित प्रवाशाला तिकीट निरिक्षकांकडे सुपूर्द करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले जाईल. आरपीएफ जवानांना प्रवाशांचे तिकीट न तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत. रेल्वे संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्वरेने निभवण्याचे निर्देश दिले आहेत.
- जे.एस. पटेल, निरिक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा.
रेल्वे क्रॉसिंगबाबत कारवाईचे अधिकार
रेल्वे स्थानकावर पादचारी पुलावरुन ये- जा न करता बहुतांश प्रवाशी हे रेल्वे क्रॉसिंग करतात. मात्र रेल्वे क्रॉसिंग करणे हे रेल्वे नियमानुसार गुन्हा आहे. आतापर्यत रेल्वे क्रॉसिंग केल्याप्रकरणी आरपीएफकडून दंडात्मक कारवाई व्हायची. रेल्वे क्रॉसिंग प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार आरपीएफकडे कायम ठेवण्यात आले आहेत.