गौलखेडा बाजारला आर.आर. पाटील स्वच्छ, सुंदर गाव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:24 AM2021-02-21T04:24:58+5:302021-02-21T04:24:58+5:30
पती-पत्नीने दुसऱ्यांदाही मिळवून दिला बहुमान : गावकऱ्यांचे सहकार्य, ‘लोकमत’कडूनही गौरव चिखलदरा : तालुक्यातील गौलखेडा बाजार ग्रामपंचायतीला दुसऱ्यांदा आर.आर. पाटील ...
पती-पत्नीने दुसऱ्यांदाही मिळवून दिला बहुमान : गावकऱ्यांचे सहकार्य, ‘लोकमत’कडूनही गौरव
चिखलदरा : तालुक्यातील गौलखेडा बाजार ग्रामपंचायतीला दुसऱ्यांदा आर.आर. पाटील स्वच्छ, सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०१६-१७ या वर्षात गौलखेडा बाजार ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्काराने तसेच स्वच्छ भारत मिशनतर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. आर.आर. पाटील स्वच्छ सुंदर गाव २०१९-२० अंतर्गत चिखलदरा तालुक्यातून ही ग्रमपंचायत प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतीने यापूर्वी ‘लोकमत’चा ‘उत्कृष्ट सरपंच अवाॅर्ड’ पटकविला आहे, हे विशेष. सरपंच सोनाली अल्केश महल्ले, उपसरपंच रामकिशोर बेलसरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सचिव सुधीर भागवत, ऑपरेटर प्रवीण येऊल यांनी यासाठी अथक परिश्रम व गावकऱ्यांच्या सहकार्याने घेतले. गावातील बर्थ डे बॉईज ग्रुपचे युवक, महिला बचत गट, जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य विभाग, कृषी विभाग आदी सर्वांनी यात सहभाग घेतला होता.
-------------
डिजिटल अंगणवाडी, पेपरलेस ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीने शाळा, अंगणवाडी डिजिटल केल्या आहेत. आय.एस.ओ. मानांकित ग्रामपंचायत कागदविरहित (पेपरलेस) करण्यात आली तसेच ग्रामपंचायत व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. गावात स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आरओ फिल्टर लावले आहे. घनकचरा व्यवस्थापनाकरिता कचरा कुंडी, घंटागाडी, नागरिकांसाठी स्वच्छतागृहाच्या ठिकाणी शोषखड्डे आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
पती-पत्नीचे योगदान
गौलखेडा बाजार ही मेळघाट मतदारसंघातील महत्त्वाचे ग्रामपंचायत आहे. माजी आमदार दिवंगत तुळशीराम काळे, माजी आमदार केवलराम काळे व जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांचे हे गाव. या ग्रामपंचायतीला २०१६-१७ मध्ये तत्कालीन सरपंच अल्केश महल्ले यांनी स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून दिला होता. आता त्यांची पत्नी सोनाली महल्ले सरपंच आहेत.
-----------
गावकऱ्यांचे सहकार्य, समाजकल्याण सभापती दयाराम काळेंसह तत्कालीन सरपंच अल्केश महल्ले यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन तसेच सचिवांचे कार्य पुरस्कारासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
- सोनाली महल्ले, सरपंच, गौलखेडा बाजार
---------------
शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या निर्देशांचे पालन, स्वच्छतेसह इतर बाबींवर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सलग दुसऱ्यांना पुरस्कार प्राप्त करता आला. यात वरिष्ठ अधिकारी व गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
- सुधीर भागवत, ग्रामसचिव, गौलखेडा बाजार