कर्ज फेडून वाचवले २८ लाख रुपये, बचत गटाची किमया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 05:57 PM2017-12-05T17:57:35+5:302017-12-05T17:57:55+5:30
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे.
चेतन घोगरे
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे. येथील सावित्रीबाई फुले महिला बचतगटाने कर्ज फेडून ११ वर्षांत तब्बल २८ लाखांची बचत केली.
सुमारे चार हजार लोकसंख्येचे दहिगाव (रेचा) येथे २००२ साली ४५ ते ५० वर्षे वयोगटातील १४ महिलांनी सावित्रीबाई फुले बचतगट स्थापन केला. दरमहा ५० रुपये याप्रमाणे बचत करणे सुरू केले. दोन वर्षात त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३० हजारांचे कर्ज मिळाले. यातून शेळ्या खरेदी केल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनातून कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली. सुरुवातीला या महिलांनी शेत केले. मिळालेल्या उत्पन्नातून व कर्ज काढून बचतगटाने २००५ मध्ये चार एकर शेत विकत घेतले.
कुटुंबाचा गाडा चालवितानाच हप्ते नियमित भरण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच प्रत्येक वर्षी एक लाखाचे उत्पन्न त्यांनी मिळवले. आज या बचत गटातील काही महिला वयाच्या सत्तरीत पोहोचल्या आहेत. बचतीचा भाग वाटून घेण्याचे या महिलांनी ठरवले असून, शेत विक्रीला काढले आहे. या शेताचे आजचे बाजारमूल्य २८ लाख रुपये आहे. बचतगटाच्या मालकीच्या शेतीच्या विक्रीसाठीचा परवानगी अर्ज तहसीलदारांकडे पोहोचला आहे.
प्रत्येकीला मिळणार दोन लाख
दहमहा ५० रुपयांच्या बचतीने सुरू झालेल्या सभासदांना विक्रीनंतर प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे, मागील ११ वर्षांत या महिलांनी उत्पादनातूनच लागवडीचा व स्वत:च्या मजुरीचाही खर्च काढला. स्वत: केलेल्या कामाचा मोबदला मिळवून घरखर्चातही मदत केली.
या आहेत बचत गटाच्या सदस्य
बचत गटाच्या अध्यक्ष दुर्गा मेश्राम, सचिव अनिता कांबळे असून, शोभा गणवीर, सुनील गजभिये, कुसुम कांबळे, महानंदा कांबळे, अन्नपूर्णा मेश्राम, राजकन्या मेश्राम, शांता ढोक, कांता मेश्राम, रत्ना बोरकर, शिटू बोरकर, भागसा शेंडे, गीता कांबळे या महिलांच्या संघटनातून सावित्रीबाई फुले बचतगटाचे कामकाज यशस्वीपणे चालवीत आहेत.
दहिगाव येथील सावित्रीबाई फुले गटाचे उत्कृष्ट कामकाज झाले असून, त्यांच्या प्रगतीचे उदाहरण आम्ही इतरांना देत असतो. गटविकास अधिका-यांच्या मार्गदर्शनात प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केल्या जातात.
- श्रीकांत ठाकरे,
तालुका समन्वयक, म.रा. ग्रामीण जीवनोन्नती अभियान