८.१९ कोटी रुपयांवर स्थिरावला करमणूक कर
By admin | Published: December 26, 2015 12:23 AM2015-12-26T00:23:40+5:302015-12-26T00:23:40+5:30
विभागाच्या पाचही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे.
२२ कोटींचे लक्ष्य : अमरावती विभाग माघारला
अमरावती : विभागाच्या पाचही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. २०१५-१६ मध्ये विभागातून करमणूक शुल्कातून २२ कोटी रुपये मिळविण्याचे उद्दीष्ट असताना डिसेंबर अखेर सरकारी तिजोरीत केवळ ८.१९ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ३ महिन्यात तब्बल १४ कोटींची वसुली करण्याचे महाकाय आव्हान महसूल विभागासमोर उभे ठाकले आहे. करमणूक शुल्क वसुलीने विभागातील पाचही जिल्हे माघारले आहेत.
चित्रपटगृह, केबल संचालक, टुरिंग टॉकीज, व्हिडीओ पार्लर, व्हिडीओ गेम आदींकडून महसूल प्रशासन करमणूक कराची वसुली करते. मल्टिप्लेक्सलासुद्धा करमणूक कर भरावा लागतो. विभागात १ मल्टिप्लेक्स, ५४ चित्रपटगृह अािण ७ टुरिंग टॉकीज आहेत. याशिवाय जिल्हास्तरावर केबल वाहिन्या आहेत. सन २०१५-१६ साठी विभागाला २२ कोटी करमणूक कराचे उद्दिष्ट होते. डिसेंबर मध्यावधीपर्यंत ८.१९ कोटींचा कर वसूल करण्यात आला. वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीची टक्केवारी ९०.५६ टक्के कर वसुली झाली होती.
मार्चअखेर मिळाले होते १४.५३ कोटी
२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी विभागाला १६.०५ कोटी रुपये करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च २०१५ अखेर विभागातून १४.५३ कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली. यात अमरावती जिल्ह्यातून ५.२५ कोटी, अकोल्यातून ४.६० कोटी, वाशीम ९५ लाख, यवतमाळ २.३० कोटी तर बुलडाण्यातून २.३० कोटी रुपये करमणूक कर रुपात प्राप्त झाले होते.
सेट टॉप बॉक्सने वाढणार कर
३१ डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक आहे. सेटटॉप बॉक्समुळे झाकलेले केबल कनेक्शन बाहेर पडेल आणि त्यामुळे करमणूक करात वाढ होणार आहे.