आरटीई प्रवेशासाठी सोडत निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:34+5:302021-04-08T04:14:34+5:30
अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ...
अमरावती : आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्हाभरातील २ हजार ७६ जागांसाठी तब्बल ५ हजार ९२२ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर आरटीई प्रवेशासाठी अर्ज सादर केलेल्या पालकांना सोडतीची प्रतीक्षा लागली होती. त्यानुसार बुधवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथे राज्यस्तरीय ऑनलॉनईन सोडत काढण्यात आली. त्यामुळे आता प्रवेशास पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज येत्या १५ एप्रिलपासून मिळणार असल्याची माहिती स्थानिक प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिली.
शैक्षणिक सत्र २०२१-२२ करिता आरटीई प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला अर्जासाठी दिलेल्या मुदतीत तांत्रिक अडचणी आल्यामुळे पालकांना अर्ज भरण्यास अडचणी आल्या होत्या. अर्ज सादर करण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २४४ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के राखीव असलेल्या २ हजार ७६ जागा आहेत. यासाठी जिल्हाभरातून ५,९२२ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठी गत वर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर सोडत काढण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यानुसार आरटीई सोडतीत प्रवेशपात्र पाल्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज १५ एप्रिलपासून मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
बॉक्स
पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार कागदपत्र
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सोडत जाहीर झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे मेसेज येणार आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीत संधी मिळाली अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रहिवाशांचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीचा दाखला, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर स्थापन केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करावे लागणार आहेत.