टपावर लगेज वाहतूक करणाऱ्या बसवर आरटीओची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:03+5:302021-08-12T04:17:03+5:30
३१ हजारांचा दंड लोकमत इम्पॅक्ट अमरावती : टपावर नियमबाह्य लगेज ठेवून वाहतूक केले जात असल्याची वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित ...
३१ हजारांचा दंड
लोकमत इम्पॅक्ट
अमरावती : टपावर नियमबाह्य लगेज ठेवून वाहतूक केले जात असल्याची वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आरटीओ अधिकाऱ्यांनी मंगळवारी शहरातील अनेक बसची तपासणी केली. वेलकम पॉईंटजवळ टपावर लगेज भरून वाहतूक करणाऱ्या एका बसच्या चालकाला ३१ हजार ७४ रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईसत्रामुळे नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या बस संचालकांचे व चालकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील पंचवटी चौकात पीडीएमसीजवळ खासगी बससाठी नियमबाह्य पार्किंग आहे. त्यानंतर याच ठिकाणावरून टपावर लगेज भरला जातो. या ठिकाणावरून इलेक्ट्रिक केबलसुद्धा गेले असून मजुरांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बसच्या टपावर लगेज वाहतूक करणे हे आरटीओ नियमांचे उल्लंघन ठरते. तरीही पंचवटी चौकात प्रवासी बसमध्ये टपावर लगेज भरून वाहतूक केली जाते. वेलकम पॉईंटजवळही लगेज भरले जाते.
लोकमतने हा मुद्दा लोकदरबारात मांडताच प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक अशफाक अहमद, मोटर वाहन निरीक्षक एस.एम. शेलार तसेच मोटर वाहन निरीक्षक सरोदे यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी वेलकम पॉईंटनजीक एका बसचालकाविरुद्ध कारवाई करून ३१ हजार ७४ रुपये दंड ठोठावला. बसच्या संचालकाने आरटीओकडे दंडाची रक्कम भरल्यानंतर आरटीओने जप्त केलेली बस सोडण्यात आली. रिंग रोडवरही तीन बसची तपासणी करण्यात आली. मात्र, यामध्ये बसचालकाचा दोष आढळून न आल्यानेे त्या सोडून देण्यात आल्या. शहरात अनेक खासगी बसची कागदपत्रेसुद्धा आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासली.
बॉक्स
दोन दिवसांत सहा बसवर दंडात्मक कारवाई
शहरातून नियमबाह्य धावणाऱ्या खासगी बसवर ६ ते १३ ऑगस्ट दरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई मोहीम सुरू आहे. यामध्ये टपावर लगेज वाहतूक व इतर नियमांचे उल्लंघन याबाबत सहा बसवर कारवाई करण्यात आली. बसचालकांकडून ३ लाख २५ हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मोटर वाहन निरीक्षक अशफाक अहमद यांनी लोकमतशी बोलताना दिली.