सदोष वाहनांवर आरटीओची नजर; योग्यता प्रमाणपत्र तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 07:47 PM2018-09-24T19:47:31+5:302018-09-24T19:47:44+5:30
योग्यता प्रमाणपत्र तपासणीत आढळलेली अनियमितता आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आरटीओतर्फे ८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाईल.
अमरावती : योग्यता प्रमाणपत्र तपासणीत आढळलेली अनियमितता आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यभरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. आरटीओतर्फे ८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाईल. याबाबत गृहविभागाने परिवहन विभागाला निर्देश दिले आहेत. या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली व प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची तपासणी होईल.
प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी करून ठराविक कालावधीसाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. पण, ही तपासणी काटेकोरपणे न केल्याचे आढळून आल्याने ३७ वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर यासंदर्भातील एका जनहित याचिकेमध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर परिवहन विभागामार्फत सध्या करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत ७ सप्टेंबरच्या रोजीच्या आदेशात असमाधान व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्णय घेतला आहे.
तरच वाहनांचे नूतनीकरण
मोहिमेदरम्यान वाहनास योग्यता प्रमाणपत्र असूनही ते सदोष आढळल्यास वाहनाचे प्रमाणपत्र निलंबित केले जाईल. योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने जवळच्या दुरुस्ती केंद्रांमध्ये अडकवून ठेवली जातील. ही वाहने रस्त्यावर चालण्यासाठी योग्य करून संबंधित वाहनमालकाला अधिकाºयांसमोर सादर करावे लागतील. त्यानंतर तपासणी करून वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण होईल.
कार्यालयप्रमुखावर शिस्तभंग
क्षेत्रीय कार्यालयामधील वायुवेग पथकांनी परिवहन संवर्गातील वाहनांच्या तपासणीत योग्यता प्रमाणपत्र नसणे अथवा असूनही वाहन रस्त्यावर चालण्यास धोकादायक असेल, तर संबंधितांवर कार्यवाहीचे आदेश आहेत. या सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित आरटीओच्या कार्यालयप्रमुखांविरुद्ध शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.
८ ते २३ आॅक्टोबरदरम्यान वाहनांची तपासणी मोहीम राबविली जाईल. तत्संबंधीचे आदेश कार्यालयांना प्राप्त झालेत.
- विजय काठोळे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.