विभागात आरटीओला मिळणार सहा ‘इन्टरसिपेटर व्हेईकल‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:54+5:302021-08-14T04:16:54+5:30
संदीप मानकर - अमरावती : विविध मार्गावर वाहनांना ठरवून दिलेल्या वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्यास आता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त (वाहन) असलेली ...
संदीप मानकर - अमरावती : विविध मार्गावर वाहनांना ठरवून दिलेल्या वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्यास आता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त (वाहन) असलेली ‘इन्टरसिपेटर व्हेईकल’ने आरटीओ वाहनाच्या स्पीडवर नियंत्रण ठेवून थेट ऑनलाईन दंडात्मक कारवाई करणार आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्याला सहा इन्टरसिपेटर व्हेईकल मिळणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी दिली.
पूर्वी पोलिसांना अशाप्रकारची अत्याधुनिक वाहने दिली होती. त्यामुळे विविध मार्गावर ठरावीक वेग मर्यादेचे वाहनचालकांनी उल्लंघन केल्यास त्या वाहनाचा वेग मोजून दोषी आढळल्यास ऑनलाईन दंड ठोठावण्यात येत होता. मात्र, आता आरटीओलासुद्धा अशा प्रकारच्या कारवाई करता येणार आहे. राज्यात २७ तर अमरावती विभागात आरटीओला सहा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहने लवकरच मिळणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याकरिता दोन, तर अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा आरटीओला प्रत्येकी वाहन मिळेल. संबधित वाहने मोटर वाहन निरीक्षकांच्या निगराणीत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावर कार किंवा इतर वाहनांना नियमानुसार ठरवून दिलेल्या किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगमर्यादेने वाहन चालविल्यास त्या वाहनाचा वेग मोजून त्याचा ऑनलाईन फोटो काढून वाहनचालकाला एक हजार रुपयापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद राहणार आहे. नॅशनल हायवेवर कारचालकांना ९० किमी प्रतितासाचा वेग मर्यादा दिली आहे. वेगवेगळ्या मार्गाचे वेगवेगळ्या वाहनांसाठी किमी प्रतितासाचा वेग ठरवून दिला आहे. वाहनांच्या स्पिडवर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्याला रोखण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेकरिता व अपघात टाळण्याकरिता त्याची अंमलबजवणी होण्याच्या दृष्टीने या वाहनाची मदत होणार आहे.