नियोजनावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:49 PM2018-02-17T22:49:33+5:302018-02-17T22:49:50+5:30
जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शनिवारी सर्वसाधारण सभेत ५ कोटी ५० लाख रूपयांचे नियोजनाचा ठराव बहुमताने पारित केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शनिवारी सर्वसाधारण सभेत ५ कोटी ५० लाख रूपयांचे नियोजनाचा ठराव बहुमताने पारित केला. हा ठराव नियमबाह्य असल्याने शनिवारच्या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. यावर सत्ताधारी पक्षाने हात उंचावून मतदान घेतले असता ठरावाच्या बाजूने ३२ मते पडलीत. त्यामुळे विरोधकांचा विरोध झुगारून ठराव पारित करण्यात आला. दरम्यान या निर्णयाविरुद्ध विरोधी पक्षाने आक्षेप घेत पुन्हा विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ५.५० कोटींचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता बळावली आहे.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. २४ चे स्वउत्पन्न व वाढीव उपकराचे सन २०१६-१७ अखेर २ कोटी व जिल्हा परिषद गुंतवणुकीतून व्याजाव्दारे ३.५० कोटी असे एकूण ५.५० कोटी मधून २५-१५, १०१-२७ या लेखाशीर्ष (लोकोपयोगी लहान कामे व योजना सन २०१७-१८) च्या नियोजनाचा ठराव सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांनी मांडला. यामधून रस्ते व अन्य विकासकामे केली जाणार आहेत. परंतु, हा ठराव नियमानुसार नसल्याने यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत या ठरावाला रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रवीण तायडे, शरद मोहोड व अन्य सहकारी सदस्यांनी वरील निधी हा जिल्हा परिषद स्वउत्पन्नाचा असून शासन निर्णयानुसार प्रत्येकी २० टक्के समाजकल्याण, पाणीपुरवठा व १० टक्के निधी हा महिला व बालकल्याण आणि ३ टक्के दिव्यांगांसाठी राखीव ठेवून ५.५० कोटीतून ५३ टक्केप्रमाणे २ कोटी ९१ लाख ५ हजार रूपयांच्या योजना मंजूर कराव्या लागतात. व उर्वरित २ कोटी ७० लाखांचे नियोजन करून ५९ सर्कलमध्ये समसमान वाटप करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. अन्यथा हा सर्व निधी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकºयांना जिल्हा परिषदेमार्फत देण्याची मागणी लावून धरत विरोधकांनी सभेत गदारोळ केला. परंतु काँग्रसचे गटनेता बबलू देशमुख यांनी विकासाचा पैसा विकासावर खर्च होईल. त्यामुळे विरोधकांपेक्षा बहुमताने हा ठराव पारित करण्याचा मुद्दा मांडत ठराव पारित केला आहे. मात्र विरोधकांनी आता या ठरावाविरोधात विभागीय आयुक्त प्रधान सचिव ग्रामविकास आणि वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत लेखी स्वरूपात तक्रारी शासन व विभागीय आयुक्ताकडे दाखल केली आहे. यावर रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रवीण तायडे, प्रताप अभ्यंकर, गौरी देशमुख, शरद मोहोड अशा एकूण २५ सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.
यावेळी सभेत प्रकाश साबळे, महेंद्रसिंग़ गैहलवार, विक्रम ठाकरे, पुजा हाडोळे, अनिता मेश्राम, सुनील डीके.व अन्य सदस्यांनी शिक्षण, बांधकाम, सिंचन, आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित प्रश्न मांडलेत. इतरही मुद्यांवर चर्चा होऊन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, काँग्रेचे गटनेते बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्रसिंग गैहलवार, सुनील डी.के, अभिजित बोके, सुहासिनी ढेपे, प्रियंका दगडकर, प्रकाश साबळे, पूजा हाडोळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, कॅफो रवींद्र येवले व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
भाजप-सेनेच्या सदस्यांमध्ये तू तू, मै मै
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत साडेपाच कोटींचा निधी शेतकºयांना नुकसान भरपाईपोटी देण्याची मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली होती. मात्र, शासन देत नाही आम्ही का म्हणून द्यावा, असा प्रश्न सत्तापक्षातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सदस्य विठ्ठल चव्हाण यांनी सभेत केला. यावर भाजपाचे प्रवीण तायडे, शरद मोहोड यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण, भाजपाचे प्रवीण तायडे, शरद मोहोड यांच्या चांगलीच तूृ तू मै मै झाली.