धानोरा कोकाटे गावात प्लस्टिकयुक्त तांदुळाची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:22+5:302021-08-01T04:12:22+5:30
शालेय पोषण आहारात फोर्टिफाईड तांदूळ, पथकाकडून पाहणी, पालकमंत्र्यांनी घेतली दखल सूरज दाहाट - तिवसा : मुलांमधील लोह, प्रथिनांची कमतरता ...
शालेय पोषण आहारात फोर्टिफाईड तांदूळ, पथकाकडून पाहणी, पालकमंत्र्यांनी घेतली दखल
सूरज दाहाट - तिवसा :
मुलांमधील लोह, प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी फोर्टिफाईड राईस मिसळलेल्या तांदुळाला प्लास्टिकयुक्त ठरवून पालकांनी थेट पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी व प्लास्टिकयुक्त तांदुळाची अफवा दूर सारण्यासाठीजिल्हा परिषदेचे पोषण आहार पथक शनिवारी सकाळी अमरावती पंचायत समिती अंतर्गत धानोरा कोकाटे येथे दाखल झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, वाशिम जिल्ह्यानंतर आता अमरावती पंचायत समिती अंतर्गत धानोरा कोकाटे येथे शालेय पोषण आहारात प्लस्टिकयुक्त तांदूळ असल्याची अफवा पालकांमध्ये उडाली. त्यामुळे काही पालकांनी थेट महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या कानी ही वार्ता घातली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा त्याची तातडीने दखल घेतली. त्यामुळे शनिवारी सकाळी ८.३० वाजता जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहाराचे पथक पाहणी व चौकशीसाठी आले. त्यांनी पाहणी करून लोकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पोषण आहारासाठी पुरविण्यात आलेला तांदूळ घातक नसून, विद्यार्थ्यांना लोहयुक्त प्रोटीन मिळावे, यासाठी काही घटक मिश्रण या तांदळात टाकल्याचे अमरावती जिल्हा परिषदेने सांगितले.
कोरोनाचे संकट असल्याने राज्यभरातील शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेतून शालेय पोषण आहाराचे तांदूळ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. मात्र, धानोरा कोकाटे येथील जिल्हा परिषद शाळेतून मिळालेल्या तांदुळात प्लस्टिक कणांची भेसळ असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. समाज माध्यमांवर अशा बातम्या व्हायरल झाल्यानंतर या गावात याची पडताळणी व चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शालेय पोषण आहाराचे पथक दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेत मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांनी गर्दी करून या तांदुळाबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
कोट
प्लस्टिकयुक्त तांदूळ आम्हाला नको. आम्ही हा तांदूळ सेवन करणार नाही. आमच्या मुलांना काही झाले तर जबाबदारी कोण घेणार?
- प्रवीण पतींगे, पालक, धानोरा कोकाटे
बॉक्स
तांदुळाचे नमुने घेऊन नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लोहाची कमतरता जाणवत असल्याने शासनाने लोह युक्त तांदूळ यातून विद्यार्थ्यांना प्रोटीन मिळावे, यासाठी काही तांदुळाचे दाण्यात फोर्टिफाईड तांदूळ मिसवळण्यात आले आहेत. त्यामुळे हे तांदूळ खाण्यायोग्य उत्तम आहे. ते विद्यार्थ्यांनी सेवन करावे, यात तांदुळात ओरिऑन, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी-टू आहे.
-अमोल इखे, शालेय पोषण आहार लेखाधिकारी, जिल्हा परिषद