ग्रामीण भागात १५ दिवसांत आढळले ३,३७६ कोविडबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:42+5:302021-04-17T04:12:42+5:30
अमरावती : शहरासह ग्रामीण भागातील १४ तालुक्यांत कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतच आहे. १ ते १५ एप्रिल या १५ दिवसांच्या ...
अमरावती : शहरासह ग्रामीण भागातील १४ तालुक्यांत कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतच आहे. १ ते १५ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत ३,३७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. यात आजघडीला २,१३९ कोरोना संक्रमित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. ५२ जण दगावले. विशेष म्हणजे दुसरी लाट पहिल्यापेक्षा भयंकरच आहे. परिणामी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
अनेक रुग्णालयांत बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचीही धावपळ होत आहे. अशात ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज आहे, अशा रुग्णावर वेळेत ही सुविधा उपलब्ध होत नसल्याची ओरड रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणेकडून कोरोना बाधित रुग्णाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही कमी पडू लागल्याचे वास्तव आहे. १ ते १५ एप्रिल या १५ दिवसांत झेडपी आरोग्य विभागाकडील अहवालानुसार वरूड, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, तिवसा, मोर्शी, धामणगाव रेल्वे या तालुक्यांत २०० हून अधिक रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. त्यानंतर चिखलदरा, दर्यापूर, नांदगाव खंडेश्र्वर, चांदूर बाजार, भातकुली, अमरावती, चांदूृर रेल्वे आदी तालुक्यांत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २,१३९ रुग्ण ॲक्टिव्ह असून या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
बॉक्स
तालुकानिहाय कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
अमरावती १२५, भातकुली १३४, मोर्शी २४०, वरूड ४८२, अंजनगाव सुर्जी २९८, अचलपूर ४१८, चांदूर रेल्वे २१३, चांदूर बाजार १८९, चिखलदरा १५१, धारणी ३१०, दर्यापूर १४९, धामणगाव रेल्वे २४७, तिवसा २९२, नांदगाव खंडेश्र्वर १२८ असे एकूण ३,३७६ काेरोना संक्रमित गत १५ दिवसांत आढळून आले आहेत.
बॉक्स
दोन आठवड्यांत ५२ दगावले
ग्रामीण भागात गत १५ दिवसात १४ तालुक्यांत ५२ जण दगावल्याची नोंद झेडपी आरोग्य विभागाने घेतली आहे. यात अमरावती १, भातकुली १, मोर्शी ६, वरूड ११, अंजनगाव सुर्जी ४, चांदूर रेल्वे ६, अचलपूर ३, चांदूर बाजार ३, चिखलदरा १, धारणी ३, दर्यापूर ३, धामणगाव रेल्वे २, तिवसा ४ असे ५२ जण दगावले.
काेट
ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यावर आवश्यक उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
- डॉ.दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी