ग्रामीण, दुर्गम भागात हातभट्ट्या पेटल्या
By admin | Published: April 17, 2017 12:01 AM2017-04-17T00:01:35+5:302017-04-17T00:01:35+5:30
हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे.
मद्यपींनी लढविली क्लृप्ती : ‘५०० मीटर‘च्या निर्बंधाने ‘गावठी’ला पुन्हा सुगीचे दिवस
अमरावती : हायवेपासून ५०० मीटरच्या अंतरावरील सर्वप्रकारची दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालामुळे शहरी व ग्रामीण भागात दारू मिळणे जिकरीचे झाले आहे. आता दारूसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागत असल्याने अनेकांनी ‘थोडी थोडी पिया करो’ चा मार्ग अवलंबून गावठी दारूकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागात पुन्हा हातभट्ट्या धगधगू लागल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार देशभरातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर आत असलेली दारुची सर्व दुकाने बंद झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानांना सील करून कागदोपत्री बंद केले आहे. अर्थात कायदेशीररित्या ही दुकाने बंद झाली असली तरी नियमबाह्य चोरीछुप्या मार्गाने दारूविक्री सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी चोरट्या मार्गाने दारूविक्री होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील दारू दुकाने बंद झाल्याने हातभट्ट्या पुन्हा पेटू लागल्या असून आदिवासी भागातील हातभट्ट्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. हातभट्ट्यांनी पेट घेतल्याने ‘गुळ व नवसागर’च्या मागणीत वाढ झाली आहे. मोहाच्या फुलांचाही भाव तेजीत आहे. शहरी व ग्रामीण भागातील महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने न्यायालयाच्या निर्णयानुसार १ एप्रिलपासून बंद झाल्याने विदेशी दारू मिळणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक गावपाड्यात हातभट्ट्यांवर तयार होणाऱ्या गावठी दारूला पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र आहे.
मद्यपींनीच शोधला फंडा
अमरावती : मद्यपींची दारूसाठी सुरू असलेली तगमग, शहरातील मोजक्या शिल्लक राहिलेल्या दारू दुकानांमधील मद्यपींची वाढती गर्दी, यातून उदभवणारे वादाचे प्रसंग लक्षात घेता मद्यपींनीच यावर ‘गावठी’चा तोडगा शोधला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तुलनेने कमी दरात उपलब्ध होणारी गावठी दारू पिण्यासाठी आता शहरातील मद्यपीनी देखील ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्यास आश्चर्य वाटू नये. (प्रतिनिधी)