निवडणुकीचा खर्च ताळमेळ जुळविण्यासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:41+5:302021-01-22T04:12:41+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३पैकी १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्यानंतर उर्वरित ५३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात ...
अमरावती : जिल्ह्यातील ५५३पैकी १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्यानंतर उर्वरित ५३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना निवडणुकीचा खर्च महिनाभरात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांनाही खर्चाची माहिती गोळा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले, तर १८ रोजी निवडणुकीची मतमोजणी करून निकाल घोषित झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार उमदेवाराला निवडणुकीत केलेल्या खर्चाचा इत्यंभूत हिशेब निवडणूक विभागाकडे सादर करावा लागणार आहे. आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील विजयी व पराभूत अशा दोन्ही उमेदवारांची निवडणुकीतील खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. हा सर्व खर्च उमेदवारांना सादर करणे बंधनकारक आहे. खर्च सादर न केल्यास उमेदवारावर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी व पराभूत उमेदवारांनी निवडणुकीचा अहवाल सादर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
बॉक्स
खर्चाचा ताळमेळ सुरू
गत दोन आठवड्यांपर्यंत चाललेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रिंगटोन असलेल्या अनेक उमेदवारांनी विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्यासाठी सर्वच फंडे वापरले आहेत. याकरिता लाखो रुपये खर्चसुद्धा केले. निवडणूक निकालावरून सध्या ग्रामीण भागात कही खुशी कही गम असे वातावरण पाहावयास मिळत आहे. अशातच आता निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक दरम्यान प्रचारासाठी तसेच अन्य कामांकरिता केलेल्या खर्चाचा लेखाजोखा जुळविताना कसरत करावी लागत आहे.