जिल्हा परिषदेच्या आठव्या वर्गासाठी शाळा व्यवस्थापन समितीची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:00+5:302021-09-05T04:17:00+5:30
वरूड : तालुक्यातील पुसला येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून आठवा वर्ग सुरू असून, शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. मात्र, ...
वरूड : तालुक्यातील पुसला येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्षांपासून आठवा वर्ग सुरू असून, शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. मात्र, खासगी शिक्षण संस्थांचे हित जोपासण्यासाठी शाळेतील आठवा वर्ग बंद करण्यासंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. यावर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुले कुठे शिकवायची, हा आमचा अधिकार आहे. आमची मुले जिल्हा परिषद शाळेतच शिकविण्याचा निश्चय केला आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणमंत्र्यांकडे लेखी तक्रार देऊन आठवा वर्ग बंद करू नये, अशी मागणी केली आहे. यामुळे खासगी विरुद्ध जिल्हा परिषद शाळा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
सन २०१७-१८ पासून पुसला येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा (मुले-मुली) येथे शासनाच्या परवानगीने आठवा वर्ग सुरू करण्यात आला. शिक्षण दर्जेदार असल्याने विद्यार्थिसंख्या पाच वर्षांपासून सुरळीत आहे, तर खासगी शाळेतील आठव्या वर्गाची संख्या रोडावली आहे. राजकीय वरदहस्त आणि शासननिर्णयाचा आधार घेत जिल्हा परिषद शाळेतील आठवा वर्ग बंद करण्याच्या हालचाली होत आहेत. परंतु, शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर न्यायालायने स्थगनादेश दिला होता. न्यायिक प्रकरणात न्यायालयाने २८ ऑक्टोबर २०२० ला सदर स्थगिती उठविली असल्याने सदर न्यायिक प्रकरणाचा अंतिम निर्णयाचे अधीन राहून कारवाही करून तसा अहवाल पाठविण्याचे आदेश अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी २८ जुलै २०२१ ला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दिले होते. यानुसार गटशिक्षणधिकाऱ्यांनी पुसला येथील आठवा वर्ग बंद करण्याचे आदेश ५ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापकांना दिले. यानंतर शिक्षणमंत्र्यांना शाळेबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे निवेदन राजू ठाकरे, सुनील लोखंडे, प्रवीण पाटणकर, सुनील हरणे, निकिता वडस्कर, नीलिमा लाड, लीला कुरवाळे, नरेंद्र डोंगरे यांच्यासह पालक शाल व्यवस्थापन समितीने दिले.
-------------पुसला येथील शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पत्र दिले नसले तरी वर्ग वाचविण्याचा माझा प्रयत्न आहे.
- राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य
-----------
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा खासगी शाळेपेक्षा चांगला आहे. इतर सुविधाही मिळतात. यामुळे मुले जिल्हा परिषद शाळेतच शिकतील. आठवा वर्ग बंद पडू देणार नाही.
- नरेंद्र डोंगरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
--------------
शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने मुलांचाही ओढा जिल्हा परिषद शाळेकडे आहे. दर्जा बरोबर असल्यानेच पालकांचाही त्याकडे कल आहे.
- सुनील लोखंडे, पालक