सा.बां. विभागच लागला रस्ते खोदायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:16 AM2017-12-29T01:16:17+5:302017-12-29T01:16:29+5:30
पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे. स्वत:च रस्ते खोदून घरगुती पाणीपुरवठा करणाऱ्यां पाईप लाईनची दुरुस्ती करून लाखो रुपये खर्चाचे रस्ते वाचविण्याचा बाका प्रसंग येथे आला आहे.
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या अथक प्रयत्नाने मिल स्टॉप ते बैतुल स्टॉपपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला. अमरावती, अकोला, बैतुल व इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक याच रस्त्याने ये-जा करते. परिणामी परतवाडा शहरातून दिवस-रात्र जड वाहतूक सुरू राहते. त्यामुळे झालेल्या चौपदरीकरणाच्या कामावरील रस्त्याची गुणवत्ता योग्य असताना काही ठिकाणी खड्डे पडू लागले आणि अधिकारी त्या खड्ड्यांचा शोध घेण्याच्या कामी लागले.
सा. बां. नव्हे पाईप दुरूस्ती विभाग
राज्यभर खड्डेमुक्त रस्ते करण्याचे अभियान सुरू असताना, परतवाडा शहरातील रस्ता चौपदरीकरणात विद्युत वितरणच्या कार्यालयापुढे रस्ता दबल्याने मोठा खड्डा पडला होता. खड्डा भरल्यानंतर पुन्हा तीच स्थिती. परिणामी दोष कुठले आहे, पाणी कुठे मुरते याचा तपास करण्याचे आव्हानच सा.बां. विभागापुढे आले व उपविभागीय अभियंता प्रमोद भिलपवारसह यंत्रणा व कंत्राटदार कामाला लागले. लाखो रुपये खर्चून तयार केलेला त्यांचा रस्ता त्यांनाच स्वत: ठिकठिकाणी खोदावा लागला. कारण रस्त्याखालून घरगुती पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ठिकठिकाणी गेल्या आहेत. त्या जुन्या झाल्यामुळे सडल्याने त्यातून पाणी झिरपून रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असली तरी लाखोंचा रस्ता खराब होत असल्याने पाईप दुरुस्तीचे कार्य सा.बां. विभागाला आता करावे लागत आहे. मात्र, या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
घरगुती पाईप लाईनमुळे रस्त्याखाली लिकेज आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सतत मोठे खड्डे महामार्गावर पडतात. आता लिकेज शोधून दुरुस्तीचे काम केले जात आहे.
- प्रमोद भिलपवार,
उपविभागीय अभियंता, सा.बां. विभाग, अचलपूर