सदोष गॅस शेगडी, जिल्हा ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:07 PM2018-11-12T22:07:57+5:302018-11-12T22:08:19+5:30
आॅनलाईन खरेदीनंतर नादुरूस्त झालेल्या शेगडीबाबत सेवा न पुरविणाऱ्या शिनाग अलाईड एन्टरप्रायजेससह फ्लिपकार्टला जिल्हा ग्राहक मंचाने दहा हजार रुपयांचा दंड १० टक्के व्याजासह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्या ज्येष्ट नागरिकाला दिलासा मिळाला .
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आॅनलाईन खरेदीनंतर नादुरूस्त झालेल्या शेगडीबाबत सेवा न पुरविणाऱ्या शिनाग अलाईड एन्टरप्रायजेससह फ्लिपकार्टला जिल्हा ग्राहक मंचाने दहा हजार रुपयांचा दंड १० टक्के व्याजासह देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्या ज्येष्ट नागरिकाला दिलासा मिळाला .
मुदलियार नगरातील रहिवासी नारायण गणपत मेश्राम (७०) यांनी ५ फेब्रुवारी २०१७ रोजी फ्लिपकार्टवर आॅनलाईन पध्दतीने सुर्या कंपनीची गॅस शेगडी ३ हजार २२९ रुपयांत बुक केली. दहा दिवसांनंतर त्यांना शेगडी प्राप्त झाली. शेगडीसोबत एक वर्षांचे गॅरंटी व वॉरंटी कार्ड मिळाले. शेगडी बिघडल्यास सूर्या कंपनीची जबाबदारी राहील, असे मेश्राम यांना कळविण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांतच ती शेगडी बंद पडल्याने मेश्राम यांनी कंपनीशी संपर्क केला. ई-मेलद्वारे कंपनीकडे तक्रार नोंदविली. मात्र, कंपनीकडून मेश्राम यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मेश्राम यांनी वकीलांमार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली.मात्र कंपनीने उत्तर दिले नाही. त्यामुळे मेश्राम यांनी ४ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली. ग्राहक मंचाकडून भिवंडी येथील फ्लिपकार्टचे व्यवस्थापक व बंगरुळू येथील शिनाग अलाईड एन्टरप्रायजेसला नोटीस जारी केल्या. ग्राहक मंचाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर विरुध्द पक्षांचा दोष सिध्द झाला. ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुदाम देशमुख व सदस्य शुभांगी कोंडे यांनी निर्णय देत शिनाग अलाईड एन्टरप्रायजेस (बंगरुळू) व फ्लिपकार्र्टने तक्रारकर्त्याला गॅस शेगडीचे ३ हजार २२९ रुपये ३० दिवसांच्या आत परत करावे, त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून १० टक्के व्याज द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश दिले. या प्रकरणात तक्रारकर्त्यातर्फे अॅड.पी.एच.मुंडवाईक व फ्लिपकार्टतर्फे अॅड. आशीष उके यांनी बाजू मांडली.
जनतेला आवाहन
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ग्राहकांसाठी कार्यरत असून, त्यांची पिळवणूक व फसवणूक होत असेल, तर त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुदाम देशमुख यांनी केले आहे.
तक्रारींच्या अनुषंगाने दोन्ही बाजू पडताळून ग्राहक मंचात खटला चालला. त्यावर अध्यक्षांनी निर्णय दिला. ग्राहकांनी न्याय मिळविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
- श्री.र. मोरस्कर, सहायक, अधीक्षक, ग्राहक मंच.