मेळघाटातील वाघांची सुरक्षा दुर्लक्षित, सीबीआय चौकशी का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:24+5:302021-02-06T04:22:24+5:30
फोटो ०५एएमपीएच०६ अनिल कडू परतवाडा (अमरावती) : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात घडत ...
फोटो ०५एएमपीएच०६
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात घडत असलेल्या आणि उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या मृतदेहाची का नाही, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मृत्यूनंतर सात ते आठ दिवसांनंतर मेळघाटात त्या वाघाचा मृतदेह कधी तरी पुढे येतो. तेव्हा तो मृतदेह सडलेला, कुजलेला असतो. मागील तीन वर्षांत अशाच पाच घटना पुढे आल्या आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील, ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीट अंतर्गत येणाऱ्या कपूरखेडा नाला येथे एका वाघाचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल नऊ दिवसांनी एप्रिल २०१८ मध्ये आढळून आला. याच व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वनपरिक्षेत्रातील धोंडा आकार राऊंडमधील जीतापूर बीटमध्ये टी-३५ नामक वाघिणीचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल सहा दिवसांनंतर, ३ मार्च २०१९ ला आढळून आला. अंबाबरवामधील टी-२३ नामक वाघाचा मृतदेह लागूनच असलेल्या मध्य प्रदेशातील सिमेत मृत्यूनंतर १५ दिवसांनंतर एप्रिल २०२० मध्ये उघडकीस आला.
रायपूर वनपरिक्षेत्रातील माडीझडप परिसरात मृत्यूनंतर पाच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला वाघाचा मृतदेह आढळून आला. तत्कालीन प्रादेशिक पूर्व मेळघाट वनविभागात चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा परिसरात मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी जानेवारी २०१९ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला. यातील काही कुजलेल्या वाघाच्या मृतदेहाचे काही अवयव प्रयोगशाळेतही पाठविले जातात. वाघ मरतात, सडतात, कुजतात. या मृत वाघांच्या फायली बनविण्यात येतात आणि पुढे या घटना फाईलबंद केल्या जातात.
बॉक्स
वाघाला आयडी नाही
व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातही वाघ आहेत. ज्या प्रादेशिक वनविभागात वाघ आहेत त्या वाघांना ओळख नाही. आयडी नाही. त्यामुळे ते बेवारस ठरत आहेत हे मोथा आणि रायपूरमध्ये आढळून आलेल्या वाघांच्या मृतदेहाकडे लक्ष वेधल्यास पुरेसे ठरले आहेत.
‘त्या वाघांचे पुढे काय?
वाघांच्या शिकारीच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २०१८ मध्ये एक गुन्हा उघडकीस आणला. यात सन २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत चार वाघ आणि एका बिबटाची शिकार प्रादेशिक वनविभागाच्या अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रातील केल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांचे समक्ष ते आरोपींचे बयाण घेण्यात आले. ही चौकशी गुंडाळून प्रकरण फाईलबंद केल्या गेले.
सीबीआय चौकशीची मागणी
सन २००५ मध्ये मनमोहनसिंग असताना राजस्थानमधील सिरस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. सन २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूरकडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारी आणि आढळून येत असलेल्या वाघांच्या मृतदेहांची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.