‘श्रीं’च्या प्रतिमेला कचºयाचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:00 PM2017-11-10T23:00:53+5:302017-11-10T23:02:12+5:30
श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री संत गजानन महाराजांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या खापर्डे वाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा व घाण साठली आहे. याच अवस्थेत भाविकांनी ‘श्रीं’च्या प्रतिमेसमोर गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आरती आटोपली. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी ‘श्रीं’च्या भक्तांनी केली आहे.
श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना साक्षात गजानन महाराजांनी खापर्डे वाड्याला भेट देऊन विश्रांती केल्याची दासगणू महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे. भाविकांकडून येथे गुरुवारी आरती करण्यात येते. परंतु, ज्यांनी ही जागा विकत घेतली, त्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने परिसरातून येथे केरकचरा टाकला जातो. या ठिकाणी झाडझुडपे वाढली आहेत.
‘श्रीं’ची प्रतिमा लावण्यात आल्याने महानगरपालिकेने सदर परिसर स्वच्छ करून घ्यावा व केरकचरा टाकण्यास बंदी करावी, अशी मागणी आरतीला उपस्थित नीलेश चावंडे, राजू खैरे, राजेंद्र परिहार, अरुण मानेकर, पप्पू राठोड, योगेश तापकिरे, सत्यनारायण यादव, आशिष पांडे, सुधाकर सावरकर, प्रकाश गावंडे, बंडू पेटकर यांच्यासह अनेक भाविकांनी केली.
महापालिकेचे दुर्लक्ष का?
खापर्डे वाड्यात श्री संत गजानन महाराजांचे भक्त दर गुरुवारी आरती करतात. महाराजांची साक्ष असलेले वृक्ष तोडण्यात आले. ते बसले होते तो चौथराही तोडण्यात आला. कुंपण घालून प्रतिबंध घातला गेला. भाविक ‘श्रीं’ची प्रतीमा लावून आरती करतात. आता तो परिसर कचरा आणि घाणीने व्यापला आहे. महापालिका तेथील कचरा का उचलत नाही, असा भाविकांचा प्रश्न आहे.